तुम्ही दिलेल्या दुव्यात ह्याविषयी एवढेच म्हटले आहे की " गद्याचे भाषांतर गद्यात किंवा पद्यात चालेल पण पद्याचे भाषांतर (शक्यतो समछंदी) पद्यातच असायला हवे. "(अधोरेखन माझे). "पद्याचे भाषांतर शक्यतो समछंदी असायला हवे" आणि " मूळ इतरभाषिक रचना छंदोबद्ध असो वा नसो, मनोगतावर तिचे सादर केले जाणारे भाषांतर छंदोबद्ध असायला हवे." ह्यात खूप फरक आहे!  छंदात लिहायचे की छंदमुक्त हेही प्रशासन ठरवणार असेल तर छंद कोणते वापरायचे,यमके कोणती वापरायची, काव्यालंकार कोणते वापरायचे  हेही प्रशासनानेच सांगावे.

"मनोगतावर सादर केले जाणारे भाषांतर छंदोबद्ध असायला हवे असे धोरण आहे."
- ह्यामागील कारण कळू शकेल काय? मनोगतच्या गृहपृष्ठावर म्हटले आहे, "ज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांना मराठीतून आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी करण्यासाठी, आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे." कवितेचे भाषांतर छंदोबद्ध नसल्यास ह्यातील कोणत्या उद्दिष्टाला हानी पोहोचते, मराठीचे काय नुकसान होते ? ज्या धोरणास सकृतदर्शनी तरी व्यक्तिगत पूर्वग्रह सोडून दुसरा कोणताही आधार  दिसत नाही त्यावर निश्चितच पुनर्विचार व्हायला हवा.