स्वतःच्या / भाड्याच्या (डेडिकेटेड) वाहनाने जाणार आहात का? असल्यास नागांवला करपे वाडी (दुवा) हा पर्याय विचार करण्यासारखा आहे.

एका कुटुंबाने स्वतःच्या बागायतीत वैयक्तिक देखभालीखाली इको/नेचर/ऍग्रो-टूरिझम (मराठी?) तत्त्वावर चालवलेला हा रिझॉर्ट (मराठी?) आहे. स्वतंत्र कॉटेजिस (झोपड्या? ) भाड्याने घेता येतात. रिझॉर्टमागील समुद्रकिनाऱ्याचा एक अख्खा मोठा भाग हा खास रिझॉर्टमधील पाहुण्यांसाठी आरक्षित असून जवळजवळ मोकळा असतो. तुमची मुलगी एक वर्षाची म्हणजे खूपच लहान आहे, पण नाहीतर लहान मुलांना दाखवायला कोंबड्या, सकाळीसकाळी गायीचे दूध काढणे वगैरे मजेदार प्रकार रिझॉर्टवरच आहेत. इकोटूरिझम तत्त्वावर असल्यामुळे आंघोळीचे पाणी बॉयलरमध्ये तापवण्याकरिता नारळाच्या झावळ्यांचा वापर, त्याच्या राखेचा रिझॉर्टमधील झाडांकरिता खत म्हणून वापर, खोल्या वगळता बाहेरच्या रोषणाईसाठी सौर ऊर्जा साठवून तिचा वापर, सांडपाण्याचा झाडांकरिता वापर, खोलीत दगडी पलंग वगैरे बरेच वेगवेगळे रोचक प्रकार आहेत. खोल्यांमध्ये टीव्ही वगैरे प्रकार नाहीत. मालकांना गाठल्यास अत्यंत आत्मीयतेने सर्व माहिती देतात. आजूबाजूची ठिकाणे (अलिबाग, चौल, रेवदंडा वगैरे) पाहण्याकरिताही सोयिस्कर जागा आहे. आणि त्या मानाने स्वस्त आहे. (एका मराठी कुटुंबाने 'नफा' हे मुख्य उद्दिष्ट न ठेवता 'काहीतरी चांगले करायचे' या तत्त्वावर चालवलेले रिझॉर्ट आहे.) अमर्याद शाकाहारी जेवण हे भाड्यात अंतर्भूत आहे. मांसाहारी जेवणाकरिता (मासे/कोंबडी) मात्र वेगळे पैसे (ऑर्डर बेसिसवर) द्यावे लागतात आणि आगाऊ सूचना द्यावी लागते. (म्हणजे रात्रीच्या जेवणाकरिता हवे असेल तर दुपारच्या जेवणाच्या वेळी सांगावे लागते, आणि दुपारच्या जेवणाकरिता हवे असेल तर शक्यतो आदल्या रात्रीच्या जेवणाच्या वेळी किंवा ते न जमल्यास निदान सकाळच्या नाश्त्याच्या वेळी सांगावे लागते.) अर्थात आपण शुद्ध शाकाहारी असल्यामुळे तो प्रश्न नाही. (जेवणाची व्यवस्था माझ्या अनुभवाप्रमाणे उत्तम आहे.)

रिझॉर्टबद्दल आणि संपर्काकरिता विस्तृत माहिती रिझॉर्टच्या वर दिलेल्या दुव्यावर मिळू शकेल. आम्ही आमच्या सात वर्षाच्या मुलाला घेऊन विस्तृत गोतावळ्यासह मागच्या डिसेंबरात गेलो होतो. दोन कॉटेजिस घेतली होती. सर्वाना (आणि विशेष करून आमच्या मुलाला) मजा आली.

आधी म्हटल्याप्रमाणे, स्वतःच्या/भाड्याच्या डेडिकेटेड वाहनाने जाण्याकरिता उत्तम जागा आहे. बसने जाणार असल्यास अलिबागपर्यंत जाऊन पुढे रिक्षा करता येते असे रिझॉर्टच्या दुव्यावर म्हटले आहे. अर्थात त्या परिस्थितीत हिंडण्याफिरण्याकरिताही बहुधा अशीच काहीतरी व्यवस्था करावी लागेल. हा पर्याय कितपत सोयिस्कर ठरेल याबाबत कल्पना नाही.

खाजगी वाहनाने जायचे झाल्यास, पुण्याहून अथवा मुंबईहून कसे जावे याकरिता व्यवस्थित मार्गदर्शक सूचना रिझॉर्टच्या दुव्यावर दिलेल्या आहेत. पुण्याहून (अधीलमधील थांब्यांचा वेळ वगळता) साधारणतः  तीन तास लागावेत.

सध्याच्या काळात/हवामानात जाणे सोयीचे आहे किंवा नाही याबद्दल मात्र कल्पना नाही. कदाचित रिझॉर्टशी संपर्क साधल्यास माहिती मिळू शकेल. किंवा अन्यत्र चौकशी करावी.