परदा(पर्दा) हा हिंदी/उर्दू शब्द संस्कृतमधील पट, पटल,  पट्टपटी(=रेशमी पडदा) या शब्दांवरून हिंदीत आला असावा. मराठीतले बुरखा आणि पर्दा हे शब्द गोशा , घूंघट, बुर्क़ा (पुन्हा हिंदी!) अशा अर्थाने, आणि पडदा हा आडवस्त्र, पापुद्रा या अर्थांनी येतात. मराठीत पडदा पाडणे(संपवणे, लपवणे), रंगमंचासमोरचा पडदा उघडणे( नाटक वगैरेंची सुरुवात होणे), पडदा राखणे(मर्यादा पाळणे) वगैरे शब्द आहेतच. असे असले तरी, पर्दाफ़ाश/भाँड़ाफ़ोड़ला  मराठीत फ़ारतर गौप्यस्फोट म्हणता येईल, पण तो शब्द गवगवा, बभ्रा, बोभाटा अशाच अर्थाने रूढ आहे. थोडक्यात काय तर, पर्दाफ़ाश(कारस्थान उघड होणे)ला मराठीत सोपा पर्यायी शब्द आहे असे वाटत नाही. या शब्दाला मराठी प्रत्यय लागतात, तेव्हा तो मराठीने स्वीकार केलेला शब्द आहे असे म्हणायला प्रत्यवाय नसावा.
परदा- नशीनसाठी पडदानशीन आहे, पण पर्दाफ़ाशला पडदाफेड म्हणत नाहीत.
ढाँचा म्हणजे रूपरेषाच नाही तर, सांगाडा; बनावट, घडण;  साँचा;  तऱ्हा, प्रकार वगैरे. पडक्या बाबरी मशीदीच्या इमारतीला मशीदीचा  ढाँचा म्हणताना अनेकांनी ऐकले असेल.  मराठीत असा विविध‌अर्थी शब्द नाही.--अद्वैतुल्लाखाँ