आवडल्यामुळे जुने सर्वच लेख वाचून काढले. 'आहे हे असं आहे' या स्वरूपाच्या या लेखनात वरवर किंवा कृतक अलिप्तता दिसत असली तरी अंतर्यामी एक चीड जाणवते. यात उत्तरे शोधण्याचा आव  नाही.अर्थात झटपट आणि सोपी उत्तरे या मालेतून अथवा इतरही कुणाकडून मिळण्यासारखी नाहीतच.

एक प्रदीर्घकालीन उपाय दिसतो तो म्हणजे जाणीवांचे सर्वंकष तीव्रीकरण आणि समृद्धीकरण. आज आपला समाज हा एक भान हरपलेला,गुंगी चढलेला, बधिर, सुस्त असा मानवसमूह  वाटतो. बाह्य देहबोलीतूनही हे ज़ाणवते. आपल्या भोवती वा दूर इतरत्र काय चालले आहे,त्याचे दीर्घकालीन परिणाम काय हे जाणून घेण्यास तो अनुत्सुक दिसतो.घटनेमागचे अन्वयार्थ निदान आपल्यापुरते तरी हुडकावे असे या समाजाच्या घटकाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वाटत नाही, त्याची तेव्हढी कुवत नाही.

प्रत्येक व्यक्तीमध्ये हे व्यावहारिक भान येऊन ती हक्क आणि कर्तव्ये या बाबतीत जागरुक बनेल, तेव्हाच  उजाडेल.

अर्थात हे सोपे नाही किंवा एकदम होणारेही नाही.दारिद्र्यनिर्मूलन, समानता, साक्षरता, शिक्षण, ज्ञान अशा कितीतरी पायऱ्या यात आहेत. खरे तर पायऱ्याही नव्हेत, ही एकाच पातळीवरची एकमेकात गुरफटलेली अनेक अंगे आहेत. त्यातच मानवप्राण्याचा जन्मजात स्वार्थ आणि इतर विकार.

यापैकी एकेक अंगाला आपापल्या परीने भिडून काम करणारी माणसे आहेतच. त्यामुळे आशावादाला जागा आहेच. एसेम जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे हे सर्व तात्काल, माझ्या हयातीच व्हावे हा (त्यांचा)आग्रह नाही.

माझे स्वातंत्र्यसैनिक वडील उदाहरण देत की  जडशीळ आणि चिखलात रुतलेल्या चाकाला गती देण्यासाठी  सुरुवातीला प्रचंड ताकद लागते. पण एकदा का जडत्वावर विजय मिळवला की मग ते चाक बाह्य अल्प ऊर्जेनिशी आपल्याच गतीने फिरत राहते.

शिवाय आपण लोकशाही हा कठिण आणि प्रदीर्घ कालव्ययाचा पर्याय निवडलेला आहे, जो उपलब्ध पर्यायांमध्ये त्यातल्या त्यात स्वीकारार्ह आहे. आणखी त्यात १९४७ साली अगदी प्रिमिटिव अशा टोळीसदृश मानव समूहापासून आपल्याला सुरुवात करावी लागली आहे.   

आता एक सर्वसाधारण विधान करण्यासाठी गुजराती लेखक गुणवंतराय मेहता  यांचे अवतरण : (हे अर्थात उपदेशपर नाही आणि श्रा. मो. यांच्यासारख्या विचारी, अनुभवसंपन्न व्यक्तीसाठी नाहीच नाही.) तशीही  या प्रतिसादात उद्धृते पुष्कळ  झाली आहेत!

"माणसने निराशावादी बनवामाटे घणां  कारणो छे, पण आशावादी बनवामाटे एकज कारण पुरतूं होय. ते ए कि अंधकारथी दिवो बुझाव्यो होय एवुं कदाय थयूं नथी, थतूं नथी."

आमेन.