माझ्या लहानपणी, मी शाळेत शिकत असताना वापरल्या जाणाऱ्या चौथीच्या इतिहासाच्या 'शिवाजीमहाराज' या विषयाला वाहून घेतलेल्या क्रमिक पाठ्यपुस्तकात पुण्याचे शिवाजीकालीन नाव हे 'पुनवडी' असेच असल्याचे नमूद केलेले असल्याचे आठवते.
(अर्थात, 'क्रमिक पाठ्यपुस्तकात छापले होते' हा कशाचाच दाखला होऊ शकत नाही, हे आगाऊ मान्य. कारण त्यानंतर, अलीकडच्या काळात त्याच क्रमिक पाठ्यपुस्तकातील काही दाखले हे 'त्याबद्दल स्वतंत्र दाखले मिळू शकत नाहीत' या कारणास्तव वगळण्यात आल्याचे समजते. त्यामुळे 'पुनवडी'बद्दलही स्वतंत्र दाखल्यांअभावी असाच विचार मांडता यावा.
मात्र, वगळलेल्या दाखल्यांबाबत, ते दाखले 'पारंपरिक इतिहासकारांनी घुसडलेले असण्या'बाबत एक मतप्रवाह प्रचलित असल्याचे समजते, तसे काही 'पुनवडी'च्या उल्लेखाबद्दल म्हणता येईल का, याबद्दल साशंक आहे. कारण, तसे काही असते, तर क्रमिक पाठ्यपुस्तकातील उल्लेख हा 'पुनवडी'ऐवजी 'पुण्यपत्तन' असाच असता, असे मानावयास जागा आहे, असे माझ्या अल्पमतीनुसार मला वाटते.
त्यामुळे, 'पुनवडी'बद्दलचा हा पाठ्यपुस्तकी उल्लेखही कितपत ग्राह्य धरावा - किंवा पाठ्यपुस्तकांतील किंवा शाळेत शिकलेल्यापैकी, किंवा फार कशाला, कोणीही सांगितलेल्यापैकी काहीही कितपत ग्राह्य धरावे - याबाबत दोन्ही बाजूंनी संभ्रम माझ्या मनात निर्माण होतो. आणि मग, 'काहीही असले तरी त्याने मला नेमका काय फरक पडतो', असा विचार करून मी ते सोडून देतो. इतिहास हे वर्तमानातल्या कोणाला ना कोणाला तरी बदडण्याकरिता वापरण्याचे उत्तम शस्त्र आहे, बाकी काहीही नाही, अशा मताकडे आजकाल कल होऊ लागला आहे. असो.)
'पुण्यपत्तन' हे पुण्याचे (एखाद्या काव्यात / नाटकात वापरण्यासाठी केलेले? ) 'संस्कृतीकरण' वाटते.