सध्या रूढ झालेल्या सोप्या देशी नावांचे अवघडीकरण किंवा लांबरुंदीकरण अजिबात करू नये. इतकेच काय, पण वर्षानुवर्षे रूढ झालेली नावे किंवा त्यांची स्पेलिंगे बदलू नयेत. कोचीनचे कोच्चि , कालिकतचे कोळ्ळ्हिकोड, औरंगाबादचे संभाजीनगर, परभणीचे प्रभावतीनगर, काशीचे वाराणशी, त्रिवेंद्रमचे तिरुअनंतपुरम, पालघाटचे पळक्कड, त्रिचनापल्लीचे तिरुचिरपल्ली, मद्रासचे चेन्नै वगैरे.
इंग्रजी भाषेच्या रोमन लिपीच्या मर्यादा लक्षात घेऊन ब्रिटिशांनी भारतीय ग्रामनामांची स्पेलिंगे केली. पुणं चे Poona, उस्मानाबादचे Osmanabad, कानपूरचे Cawnpore यांहून चांगली स्पेलिंगे शक्य नाहीत. आता मात्र, आपल्या अडाणी राजकीय नेत्यांनी ही स्पेलिंगे बदलून प्यून, अस्मानाबाद, कॅनपर् असले उच्चार होतील असली स्पेलिंगे केली आहेत. खड़कीतल्या ड़चा खास उच्चार लक्षात घेऊन केलेले कऽर्क्-ई हे, खड़की या उच्चाराचे सर्वात जवळचे स्पेलिंग आहे. (वाड़ा आणि डावा यांतल्या दोन डांचे उच्चार वेगळे आहेत हे माहीत असावे. त्यांचे उच्चरण करताना जीभ तोंडातल्या वेगवेगळ्या भागांना स्पर्श करते. ) म्हणूनच रूड़केला, रूड़की, कूपवाड़ा, बाँसवाड़ा, खड़कपूर यांच्या स्पेलिंगमध्ये डीच्या ऐवजी आर येतो. मॅडाबाद होऊ नये म्हणून अहमदाबादमध्ये एम्ईडी होते. आपण दिल्ली म्हणत असलो, तरी पेशवाई काळात ती दिल्ही होती, आणि आजही पूर्व उत्तरप्रदेशातले लोक तिला देलही म्हणतात आणि दुसरे अनेक देहली. विशेष नामांची भाषेगणिक रूपांतरे होतात यात काही नवल नाही. जीजस क्राइस्ट महाराष्ट्रात येशू ख्रिस्त होतो तर हिंदीभाषी मुलखात ईसा मसाही.
मानस सरोवरची गोष्ट तशी नाही. ते मुळात मानस होते आणि अजूनही आहे. मराठीसकट कोणकोणत्या इतर भारतीय भाषांत त्याला मानस म्हटले आहे ती माहिती त्या विदुषीच्या लेखात आहे. लेखिकेने नावे दिलेल्या ग्रंथांशिवाय (१)वंडर्स ऑफ़ दि हिमालयाज़(सर फ्रॅन्सिस यंगहज़बंड-१९२४), ट्वेंटी ईयर्स इन दि हिमालयाज(मिस्टर ऍंड मिसेस ब्रूस-१९१०), अबोऽड ऑफ़ स्नो(केनेथ मेसन) इत्यादी डझनभर पुस्तकांत ते मानस सरोवर आहे. संस्कृत रामायण(१.२४.८)-पहिले कांड(बालकांड)-सर्ग २४-श्लोक ८वा येथे, आणि (मराठीतल्या हरिवंशात(२३.९-१०) इथे ते मानस सरोवरच आहे.
हिंदीभाषक शब्दोच्चारांच्या बाबतीत फार गलथान आहेत. मथुराचे जे मथरा(आणि म्हणून स्पेलिंग Mutra)करतात, त्यांनी मानस सरोवराचे मानसरोवर झील केले तर आश्चर्य नाही. हल्लीहल्लीच्या इंग्रजी नकाशांत आणि लेखांत ते, लेक मानसरोवर असते. सरोवर म्हणजेच झील किंवा लेक, हे असे लिखाण करणाऱ्यांच्या गावीही नसते. त्यांच्या लेखी मानसरोवर हेच विशेष नाम आहे.