मुंबईच्या संमिश्र भाषेवर गुजरातीचा प्रभाव आहे.'मांगवुं' हे  गुजरातीत एक सहाय्यक क्रियापद आहे. 'तमे शुं कहेवा मांगो छो?' म्हणजे तुम्ही काय सांगू इच्छिता? अर्थात 'तुम्हाला म्हणायचंय तरी काय? किंवा 'हुं जोवा मांगूं छुं. 'म्हणजे केवळ 'मी पाहू इच्छितो'इतकेच नव्हे तर '(ती गोष्ट) मला पाहायला मिळावी अशी मी मागणी करतो.' मुंबईच्या मराठी मध्ये 'तो काहीच करायला मागत नाही' ह्या वाक्यातून साधी इच्छा प्रगट होते, मागणी नव्हे. हा सूक्ष्मसा अर्थ बदल मराठीने केला इतकेच. बाकी हा गुजरातीचाच प्रभाव आहे. तसेच 'आलो होतो' च्या ऐवजी 'आलेलो', 'गेली होती'ऐवजी 'गेलेली', 'दिलं होतं'च्या ऐवजी 'दिलेलं' हे सर्व 'आवेलो',गयेली''दीधेलुं/आपेलुं'चे मराठीकरण आहे. कर्म. भू. धा. वि. ही क्रियापदाप्रमाणे वापरण्याची पद्धत गुजरातीमध्ये वैकल्पिक म्हणून अद्यापही आहे. मराठीतही अशी रचना तुरळक दिसते.