जे आपण वाचले असेल ते पूर्वी मराठी भाषक वर्तमानपत्रांत लिहीत असत ते मनेका. आमच्याकडे मेनका गांधींची हिंदी भाषेतली पुस्तके आहेत. त्यावर लेखिका म्हणून मेनका लिहिलेले आहे. मराठी सोडून अन्य भारतीय भाषेत त्या मेनकाच असतात. हल्लीहल्ली त्यांचे नाव मराठीतही योग्य रीतीने छापायला सुरुवात झालेली आहे असे आढळेल.
मराठी लोक अन्य भारतीयांच्या नावांबद्दल थोडेसे अनभिज्ञच असतात. सौरभ गांगुलीला सौरव म्हणणे ही असलीच एक चूक. बंगाली लोक इंग्रजी व्ही या मुळाक्षराचा उच्चार भी करतात. त्यामुळे भिक्टरी, भॉइसरॉय, प्रोभिजन स्टोर्स असले शब्द त्यांच्या बोलण्यात ऐकू येतात. त्यामुळे ते सौरभ या उच्चारासाठीचे स्पेलिंग Saurav करतात. आपण त्याचा उच्चार ते करतात तसाच, म्हणजे सौरभ करायचा असतो. अजॉय, बोस अशा उच्चाराची नावे बंगाली लिपीत अजय, वसु अशी लिहिली जातात.
थिरुपती, थिरुवेंगडठण, कलावथी, प्रागसाम व सुब्बलक्ष्मी ही मंडळी मुळांत, अनुक्रमे तिरुपति, तिरुवेंकटतन, कलावती, प्रकाशम(लिहिताना प्रकाचम्) आणि शुभलक्ष्मी(लिहिताना चुप-इलच्चुमि) असतात. तमिळ लिपीत क-च-प-ट-त या वर्गांत प्रत्येकी दोनच व्यंजने आहेत. त्यांच्याकडे थ नसल्याने 'त'साठी टीएच वापरले तरी ते त्याचा उच्चार थ करत नाहीत. आपणमात्र टीएच पाहिले की उच्चार थ करून मोकळे होतो. प्रचलित तमिळ लिपीत ज, स, श, ष, ह, क्ष हीसुद्धा अक्षरे नाहीत. त्यामुळे च या अक्षराचा श, ष, स यांपैकी कुठलाही एक ठरावीक उच्चार होतो. तमिळ माणसे ह साठी क, क्ष साठी ट्च, ष्टऐवजी ट्ट, आणि षऐवजी ट लिहितात.
एकूण काय, M A N E K A चा उच्चार मेऽ न का ! --अद्वैतुल्लाखान