महेशराव,
तुमच्या स्मरणशक्तीला दंडवत... :)
'जिऊ'च्या अनेक ओळी तुमच्यामुळे वाचायला मिळाल्या.
मलाही अंधूकसे आठवत होते की, या कवितेत आई आणि मुलगी आहे खास! तो अंदाज काहीसा तरी खरा ठरला म्हणायचा. :)
चित्त यांनी म्हटल्याप्रमाणे -
गोधूम वर्ण तीचा हरणाच्या पाडसापरी डोळे
स्नेहाळ वदन नामी प्रसन्न विधुबिंब जेवी वाटोळे
तो केशपाश काळा भाळावर लांब आडवे कुंकू
जणू म्हणती शब्द तीचे आम्ही कोकिलरवासही जिंकू
या ओळी माझ्याही स्मरणात होत्या आणि आहेत... विशेषतः 'भाळावर लांब आडवे कुंकू' हा अर्धचरण तर स्मरणात अगदी पक्का ठसलेला आहे. कारण, असे 'लांब आडवे कुंकू' लावणाऱया नऊवारीतल्या स्त्रिया (खासकरून माळी समाजातील. क्वचित मराठा समाजातीलही. ) मी माझ्या लहानपणी आसपास खूप पाहिलेल्या होत्या. या कुंकवाला 'चिरी' असे म्हटले जाई, असे आठवते. हे 'भाळावर लांब आडवे कुंकू' लावण्याचा एक 'सोहळा'च असे. मोठा वेळखाऊ 'सोहळा'.
बाई डाव्या हातात आरसा घेऊन बसे. लाकडी चौकटीचा आरसा. त्या चौकटीवर बारीक बारीक सुबक कलाकुसर, नक्षीकाम. या आरशाचा आधार असे तो डावा गुडघा. उजव्या हाताशी कुंकवाचा लाकडी करंडा. हा करंडाही अगदी सुबक असे. उजव्या हाताच्या बोटाच्या-अगंठ्याशेजारचे बोट-पहिल्या पेरावर चिमूटभर कुंकू घ्यायचे. ते अंगठ्याने जरा सारखे करायचे आणि त्या बोटाच्या डावीकडील कडेवर आणायचे. मग कपाळाचा मध्य साधून दोन्हीकडे समप्रमाणात रेखली जाईल, अशा बेताने कुंकवाची जाडसर रेघ त्याच कडेने रेखायची... ही झाली चिरी. इथे चिरीचा पहिला टप्पा संपला.
पुढे आता या ऱेघेला आकार द्यायचा असे. तो देताना पदराच्या टोकाचा वापर केला जाई. पदराचे थोड़ेसे टोक तोंडात घालून, जिभेच्या टोकावर ठेवून थुंक्याने (किंवा थुंकीने! ) ओले करून घ्यायचे आणि त्या रेघेभोवती कुकंवाचे जे काही कण कण राहिलेले असतील, ते रेखीवपणे, कोरीवपणे टिपून काढायचे, पुसून टाकायचे... इथे दुसरा टप्पा संपला.
हा 'सोहळा' झाल्यानंतर आरसा एकदा जवळ आणायचा... पुन्हा दूर न्यायचा... मान थोडी डावीकडे वेळावायची, कुंकवाकडे पाहायचे... नंतर उजवीकडे वेळावायची... पुन्हा कुंकवाकडे पाहायचे... नंतर चेहरा अगदी सरळ ठेवून तो निरखायचा... थोडा खाली-वर करायचा. हनुवटी गळ्याला चिकटेल- न चिकटेल असा... कुंकू कपाळाच्या अगदी मधोमध आणि रेखीव आलेले आहे ना, याची खातरजमा करायची... इथे 'चिरीसोहळ्या'ची सांगता होत असे.
पण यानंतर आणखीही एक लोभसवाणी, मोहक अशी कृती या बायका करीत असत. नाक मुरडून नथ एकसारखी कऱणे, ही ती कृती होय!
बाई दिसायला सुंदर असेल, तिचा चेहरा गोल-गरगरीत, वाटोळा, चंद्रासारखा असेल तर मग काही प्रश्नच नसे. आधीच असा चेहरा, त्यात ठसठशीत लालजर्द (कधी कधी काहीशी काळपट लालही) चिरी, ठळठळीत अशी घसघशीत नथ... ते नाक मुरडणे वगैरे वगैरे... पण साधारण चेहऱयाच्याही बायका या चिरीमुळे आणि नथीमुळे अशा काही विलोभनीय दिसत की बस्स! ते साधेभोळे, ग्रामीण सौंदर्य कोणत्याही ब्यूटी पार्लरमध्ये विकत मिळणार नाही... पर्स कितीही रिकामी करायची तयारी असली तरीही! असो.
'जिऊ'मुळे कुठल्या कुठे जाऊन पोहोचलो मी! पण तो अर्धचरण लक्षात का राहिला असावा, ती पार्श्वभूमी सांगावीशी वाटली, म्हणून हा 'चिरी'स्मरणीय शब्दप्रपंच !
....
महेशराव, पुन्हा एकदा धन्यवाद.