जोडाक्षराआधीच्या अक्षरावर आघात इ. मराठीच्या प्रवृत्तीविषयीच्या चुकीची दुरुस्ती आधीच्या प्रतिसादातून झाली आहे.इथे विसर्ग आणि महाप्राणाविषयीची काही सर्वसाधारण निरीक्षणे नोंदवावीशी वाटतात.सध्या संस्कृत भाषा अगदीच अल्प प्रमाणात अगदी अल्प लोकांकडून बोलली जाते. संस्कृत भाषा बोलावी लागणाऱ्यांमध्ये दोन प्रकारचे लोक असतात. १) संस्कृत शिकवणे हा ज्यांचा पेशा आहे असे शाळा ते महाविद्यालयीन पातळीवरचे लोक.२)पूजाविधी सांगणारे, याज्ञिकी करणारे उपाध्याय. यापैकी दुसऱ्या प्रकारच्या लोकांकडून संस्कृत ऐकण्याचा योग अनेकांना अनेकदा येतो तसेच लहान मुलांच्या संस्कृतपठणस्पर्धा (गीतेचे अध्याय, गणपतिअथर्वशीर्ष इ. ) ऐकण्याचा योग व्यक्तिशः येतो. त्यावेळी असे जाणवते की संस्कृत वाक्यांतर्गत विसर्ग असेल तर विसर्गापुढील अक्षरानुसार त्याचा अवग्रह, र्, श्, ष्, स् इ. होऊन उच्चारण सोपे होऊन जाते. पण वाक्यांती असेल तर थोडी गडबड होते़. उदा. उपचारैः चा उच्चार उपचारै,उपचारय् असा ऐकू येतो. पूजितो यः सुरासुरैः मध्ये यः मध्ये हिसका असतो पण सुरैः चा सुरै किंवा सुरय् होतो. गणपति: प्रीयताम् ऐवजी गणपती प्रीयताम् असे ऐकू येते. रामहा(रामौ रामाहा), प्राणाय नमहा अपानाय नमहा,व्यानाय नम्हा उदानाय नमा हे नित्याचे. शिवाय त्वं गुणत्रयातीता त्वं कालत्रयातीता. (संधिसकट एका दमात म्हणता येत नाही म्हणून.)
आणखी एक जाणवते की महाप्राणाचा उच्चार स्पष्टपणे होत नाही.मराठीच्या कित्येक बोलीभाषांमध्ये ही प्रवृत्ती आहे. महाप्राणाचा लोप होणे,(कधी-कदी, केव्हा-कवा, माझ्या-माज्या ,पहिला-पयला,कुठं-कुटं इ. )किंवा शब्दातल्या मधल्या अक्षरातला महाप्राण पहिल्या अक्षरामध्ये ओढला जाणे, (पुढे-फुडे, पहाटे-फाटे, पाहिजे-फायजे इ). हीच प्रवृत्ती थोडीशी संस्कृत मध्ये डोकावते. ब्रह्म हा उच्चार ब्रम्म किंवा भ्रम्म असा ऐकू येतो. ऊर्ध्वमूलम् अधःशाखम् अश्वत्थंप्राहुरव्ययम् मधले दोनतीन महाप्राण तरी गळतातच. त्वं मूलाधारस्थितोsसि नित्यम् मध्ये हमखास स्तितोसि असेच ऐकू येते. याशिवाय ऱ्हस्व इकार-उकार शब्दान्ती दीर्घ उच्चारणे उ. तृप्यंतू, तुष्टिरस्तू, नमामी, वदामी हेही आढळते. (ही ही मराठीची लकबच.)
हे सर्वसाधारण जीवनातले सर्वसाधारण निष्कर्ष आहेत. अखिल भारतीय वैदिक/वेदपाठकांची तुलना करून काढलेले नाहीत. तसेही, 'जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते' या अत्यंत श्रुतिमधुर स्तोत्राची घनपाठीयांकडून वाट लागताना ऐकलेले आहे.
इतर भाषकांच्या तुलनेत(तुलनेतच) मराठी भाषकांचे संस्कृत उच्चार बरे असतात, हे खरे.