सेवाभावी डॉक्टर फारच विरळा, अपवादात्मक असून औषधालाही सांपडणार नाहींत अशी परिस्थिती आहे.

उदाहरणार्थ कामगार विमा योजना ही डॉक्टर लोकांनीं जवळजवळ बुडवली आहे असें म्हणायला प्रत्यवाय दिसत नाहीं. या योजनेअंतर्गत डॉक्टरांना दर पेशंटमागँ महिन्याला ठराविक रक्कम मिळते. परंतु बिचाऱ्या गरीब कामगारांना वेगळ्या 'क्यू' मध्यें तिष्ठत ठेवून नंतर आलेल्या स्वतःच्या खाजगी रुग्णांवर प्रथम उपचार करतात. विमा योजनेखालचीं औषधें कमी दर्जाची आहेत असें खोटें सांगून महागडी औषधें विकत घ्यायला लावतात. दोन्हीं औषधांतली जेनेरिक औषधी द्रव्यें सारखींच असतात. असे शेंकडों कामगार बंधू मी आत्तां देखील उभे करून दाखवूं शकतो.

सध्यां डॉक्टर लोक पेशंटला मानसिक आधार देण्याऐवजीं प्रचंड घाबरवतात आणि अवास्तव खर्चांत टाकतात. बऱ्याच वेळां खाजगी रुग्णालयांत दाखल केलेल्या रुग्णांना कधीं बाजारांत उपलब्ध नसलेलीं औषधें तर कधीं थेराप्युटिक्सच्या पुस्तकांत एकमेकांशीं इनकॉंपॅटिबल आहेत वा काँट्रॅइंडिकेटेड असें वर्णन असलेलीं, औषधें लिहून देतात आणि तीं घेऊन तब्येत खालावल्यावर जास्त दिवस ठेवतात. मेडिकल सीक्रसी ऍक्टमुळें अशा ताज्या केसेसचे कागदपत्र मिळवणें अशक्य आहे. पण जुने कागदपत्र जरूर पडल्यास हजर करूं शकतां येतात.

तेव्हां लेखक डॉक्टरसाहेबांनीं कोणताही पूर्वग्रह न ठेवतां समाजांत इतर डॉक्टर काय करताहेत हें कृपया उघड्या डोळ्यानें पाहावें.

चांगल्या सेवाभावी व्रतस्थांना विसरायचं अन वाईट वागणाऱ्यांची खुलेआम चर्चासत्रे भरवायची ही तर समाजाची वृत्ती.

व्रतस्थांना कोणीही विसरत नाहीं. डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. अनिल अवचट, मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रियांचा विक्रम करणारे अनेक सर्जन्स यांचा सत्कार समाज करतो आणि शासनही करतें. कृपया अशा दुर्लक्षित सेवाभावी व्रतस्थांचीं नावें जाहीर करावींत वा यादी द्यावी. समाज तसेंच शास्न अशा सन्माननीय डॉक्टरांचा जरूर सन्मान करील.

रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेतले जात नाही किंबहुना तसे उद्दिष्ट त्यांच्यापुढे मुळीच नसते.

रुग्ण मृत्यू पावला म्हणजे बरा झाला नाहीं असें म्हणतां येईल. आज कोणत्या रुग्णालयांत पेशंट मृत्यू पावला तर पैसे न घेतां मृतदेह दिला जातो? तेव्हां हें विधान साफ चुकीचें आहे.

तेव्हां लेख सत्यस्थितीदर्शक आहे असें म्हणतां येणार नाहीं.

सुधीर कांदळकर

(संपादित : प्रशासक)