सुरेश भट आणि 'गझलसम्राट'


कविवर्य सुरेश भट यांना त्यांच्या काव्यपठणाच्या कुठल्याशा कार्यक्रमात 'गझलसम्राट सुरेश भट' असे निवेदकाने संबोधले होते. तोच धागा पकडून पुढे कार्यक्रमाच्या ओघात भटसाहेबांनी 'गझलसम्राट' या उपाधीविषयी त्यांची स्वतःची काय भूमिका आहे, ती नेमक्या आणि मोजक्या शब्दांत मांडली होती.

भटसाहेब जे काही म्हणाले होते, त्याचा आशय असा होता :  मी काही कुणी सम्राट वगैरे नाही. सम्राट म्हटले की सिंहासन आले.  सम्राट येतात आणि जातात. सिंहासने आज असतात; उद्या नसतात. मी ठामपणे जमिनीवर उभा आहे. जमीन कुठेही येत नाही की जात नाही. मला जमिनीवरच उभे राहू द्या.

कुठल्याही क्षेत्रातील नामवंत व्यक्तींविषयी आदर व्यक्त करण्याची, प्रेम व्यक्त करण्याची त्यांच्या चाहत्यांची एक पद्धत असते. या आदरापोटी, प्रेमापोटीच अशा उपाधी, बिरुदावली निर्माण होत असतात. लोकमान्य, महात्मा, बालगंधर्व, मलिका-ए-गझल, गझलसम्राट, बिग बी, वन मॅन इंडस्ट्री इत्यादी याचीच उदाहरणे होत.

भटसाहेबांना स्वतःला 'गझलसम्राट' म्हणवून घेणे हे अजिबात आवडत नसे, याविषयीचा उल्लेख वर आला आहेच. भटसाहेबांना जे जवळून ओळखत असत, त्यांना हे नीट ठाऊक होते. पण लोकांनी आपल्याला काय उपाधी द्यावी, हे त्यांच्या हाती अर्थातच नव्हते. या उपाधीशिवायच त्यांनी चाहत्यांच्या प्रेमाचा सहर्ष स्वीकार केलेला होता. तो माणूस अंतर्बाह्य प्रेमळ होता. मायाळू होता. अट एकच होती : अंतरीची खूण पटली पाहिजे !

होतकरू गायकांची उमेद वाढावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे, या गायकांनी निवडलेली वाट अधिकाधिक सुकर व्हावी म्हणून भटसाहेबांनी काही गायकांना  अशा उपाधी उत्स्फूर्तपणे दिल्या होत्या, याचे स्मरण इथे होते.