बर्याच वर्षांपूर्वी सोलापूर येथे झालेल्या भट साहेबांच्या एका काव्यवाचनाच्या कार्यक्रमाची आठवण ताजी झाली. काव्य वाचन आणि पार्श्वभूमी या रूपात हार्मोनियम आणि सतारीची हलकी सुरावट अशी संकल्पना होती. सतार श्री. विवेक लिमकर वाजवणार होते. ऐनवेळी हार्मोनियमची साथ करण्याची संधी गुरूजीनी अस्मादिकाना दिली.

भट साहेब मोजक्या शब्दात फक्त रागाचे नाव, वादन आलाप अंगाने हवे की 'जोड' चा आभास होइल असे थोडे लयबद्ध हवे हे सांगत. आम्ही बिचकत बिचकतच तसे वाजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो. त्यांच्यापुढे आम्ही म्हणजे सूर्यापुढे काजवेच, पण एखादी सुरावट आवडली तर जोरदार, दिलखुलास दाद यायची. थोड्याच वेळात आमची भीड चेपली, मनावरचे दडपण दूर झाले. मी गझलसम्राट, मग या पोराटोराना वादनासाठी का आणले म्हणून कपाळावर आठी हा प्रकार तर मुळातच नव्हता.   

शेवटी त्यानी दिलेली शाबासकी/ आशीर्वाद  इतके सॉलिड होते की एखाद्या कुडमुड्या ज्योतिष्याला ज्योतिर्भास्कर म्हणावे तसे वाटले.