दुर्दैवाने भटसाहेबांसारखे कर्तृत्व कुणाचेच नाही. कारण भटसाहेबांनी मराठीला गझलेचे तंत्र दिले.
हेच तंत्र पाळून आजही गझला केल्या जातात व 'ज्या गझला त्या तंत्रात नाहीत' त्यांना किमान एका संकेतस्थळावर 'गझल म्हणून' रद्दबातल ठरवले जाते, विचाराधीन केले जाते, हे खूप मोठे आहे.
यावरच खरे तर विषय संपायला पाहिजे जर... विषय चालू ठेवणारा 'गझलकार' असेल तर!
भटांच्या शिष्योत्तमांनीही भटांच्यासारख्या (दर्जाच्या दृष्टीने) गझला केल्या नाहीत ना त्यांच्याइतकी सुप्रसिद्धी मिळवली हे आश्चर्यकारक आहे.
रसिकाने आवडत्या कलावंताला कोणतीही उपाधी द्यावी, त्यावर कुणाचेही नियंत्रण असूही शकत नाही व असण्याचे कारण तर मुळीच नाही. 'सम्राट' ही उपाधी मात्र अंध प्रेमातून आल्यासारखी 'वाटते'! तसेच, भटसाहेबांबाबत 'काही ऐकूनच घेणार नाही' ही भूमिकाही 'अलवचिक' वाटते. गझल किंवा कोणताही काव्यप्रकार हा एक प्रवास आहे व 'कोण कुठे पोचला आहे' यावर चर्चा होण्यापेक्षा 'सामान्य, रस्त्यावरच्या माणसाला आपण आपली कविता / गझल वाचून दाखवू शकतो का व त्याची वाहवा मिळवू शकतो का' हा प्रश्न महत्त्वाचा ठरावा! असे केल्याने आपण 'आशयाच्या शक्यतांच्या शक्यता, हेतूपुरस्पर संदिग्धता' वगैरे भलावणींपासून दूर राहतो व जमीनीवरचे कवी राहतो असे मला वाटते. भटांची गझल यमकानुसारी आहे हे खरे आहे. त्यात काहीच 'हरकत घेण्यासारखे' वाटत नाही कारण गझल मुळातच 'यमकानुसारी' असते, पारंपारिकरीत्या! आणि त्यांची गझल कुणालाही 'समजते' हे विशेष आहे. त्यांच्या गझलेत आक्रमकता आहे ती त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीमुळे! त्यांचे चिरंजीव 'उगाचच' आक्रमक गझल करत नाहीत यावरून हे सिद्ध व्हावे.
मला स्वतःला भटसाहेबांची गझल 'एक रसिक म्हणून' दहा टक्क्यांपेक्षा जास्त आवडत नाही. तरीही मी त्यांनीच लिहिलेल्या तंत्रावर गझल रचत बसण्याचे 'किरकोळ व 'छटाक' प्रयत्न करत बसतो. आवड निवड वेगळी व तंत्राची देणगी वेगळी असे मत मांडावेसे वाटते. त्यामुळे, पदवी ही 'संस्थापकाला' दिली गेली आहे हे नोंदण्यासारखे / नोंदवून घेण्यासारखे आहे असे मत मांडतो. 'सम्राट' ही विशिष्ट पदवी योग्य आहे की नाही इतकीच चर्चा खरे तर महत्त्वाची वाटते.
-'बेफिकीर'!