मीं तज्ञ नाही, तरी पण दूरदर्शन वा भारतीय चित्रवाणी वाहिनीवरील इंग्रजी
उच्चार मला बरोबर वाटतात व त्याबद्दल अभिमान आणि कौतुक वाटतें.
मला वाटते त्यातसुद्धा फरक करता येईल. दूरदर्शनवरच्या (विशेषतः दिल्ली केंद्रावरच्या/राष्ट्रीय वाहिनीवरच्या) वृत्तनिवेदकांचे, किंवा प्रोनोय रॉयप्रभृती मंडळींचे इंग्रजी उच्चार निदान एके काळी तरी चांगले असत. ('एके काळी' अशासाठी, की गेल्या दीडएक तपात माझा आकाशवाणी/दूरदर्शन/भारतीय वृत्तवाहिन्या यांच्या प्रसारणांशी म्हणण्याइतका संबंध आलेला नाही, त्यामुळे सद्यस्थितीची कल्पना नाही. जे काही लिहीत आहे ते केवळ आठवणींवरून.) तसेच आकाशवाणीवरील दिल्ली केंद्रावरून येणाऱ्या राष्ट्रभर प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्यांमधील वृत्तनिवेदकांचे किंवा एकंदरच आकाशवाणीच्या दिल्लीहून राष्ट्रभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातील इंग्रजीतील निवेदकांचे उच्चार सहसा चांगले असत. (मुंबई 'अ'वरील इंग्रजीतील निवेदनांतील उच्चारही बरे असत.) मात्र, पुणे विविध भारतीवर अतिक्वचित्प्रसंगी येणाऱ्या 'धीऽस ईऽझ दीऽ कमऽरशीयऽल ब्रॉऽडकाऽस्टींऽग सरव्हीऽस ऑऽफ ऑऽल ईऽण्डिया रेऽडियो पुणे' या निवेदनातील 'स्ट्रेट फ्रॉम सदाशिव पेठ' आघात ऐकवत नसत.
याचा अर्थ रस्त्यातल्या सर्वसामान्य दिल्लीकराचे किंवा रस्त्यातल्या सर्वसामान्य मुंबईकराचे इंग्रजी उच्चार खूप चांगले असतात असा मुळीच घेऊ नये. याचा अर्थ फार फार तर एवढाच घेता येईल, की दिल्ली किंवा मुंबई केंद्रांवर इंग्रजीतील निवेदकांसाठी भरती करताना जरा बरे उच्चार करू शकणाऱ्या (कदाचित एका विशिष्ट वर्गातील - येथे 'वर्ग' या शब्दाचा अर्थ 'जात', 'आर्थिक स्तर' किंवा 'प्रादेशिकता' असा न घेता 'क्लास' असा सर्वसाधारण घ्यावा. मात्र या 'क्लास'चा आर्थिक किंवा शैक्षंणिक स्तराशी कदाचित थोडाफार संबंध असू शकेल, पण अन्योन्य नाही.) व्यक्तींना प्राधान्य दिले जात असणे शक्य आहे, तर पुणे 'ब' (= विविध भारती) केंद्रावरील भरती (कदाचित सत्पात्र उमेदवारांच्या अनुपलब्धतेमुळे किंवा अनिच्छेमुळे) 'मिळेल-तो-उमेदवार' तत्त्वावर होत असणे अशक्य नाही. (तसेही हे निवेदन दिवसातून फार फार तर एकदा किंवा जास्तच झाले तर दोनदा होणार, म्हणूनही कदाचित दर्जास फारसे महत्त्व दिले जात नसणे शक्य आहे. )