संजय जी, माझे मत आणि अनुभव थोडक्यात सांगतो. मी अशा काही मैफिली ऐकलेल्या आहेत, की गायन/ वादन/ नृत्य संपल्यावर श्रोत्याना टाळ्या वाजवायचेही भान राहत नाही. समग्रपणे तल्लीन झालेली, अवाक झालेली आणि अंतर्बाह्य प्रसन्नता (शांतता वा रिक्तता म्हणणे मला फारसे आवडत नाही) जाणवणारी अशी ती अवस्था असते. ती ध्यानावस्थेच्या जवळची खचितच असते. मंडळी भानावर आली की टाळ्यांचा कडकडात होतो.
स्वर, लय आणि ताल मिळून एक विलक्षण नादकल्लोळ चालू असतानाच कलात्मक पद्धतीने मध्येच एखादा अनपेक्षित विराम कलाकार घेतो त्याचे सौंदर्य काही औरच! शांतता आणि नाद मिळूनच नादब्रह्म होते. यातला संबंध 'द्वैताद्वैतविलक्षण' असा म्हणावा लागेल. भर दुपारी शेतात घाम गाळणार्यालाच सावलीला बसून एक ग्लास ताक पितानाही विलक्षण आनंद मिळतो तसाच हा प्रकार मला वाटतो. एक उदाहरण द्यायचे तर उ. निजामुद्दीन खान ठुमरी, धून ची साथ करताना शेवटी जी बेजोड लग्गी वाजवायचे, त्यात लग्गीचा प्रकार बदलताना जो सांधेबदल असतो त्यात असे जीवघेणे विराम असायचे. (हे सारे व्यावहारिक अर्थाने, मैफिलीच्या संगीताच्या सन्दर्भात)
शांतता हा संगीताचा परमोच्च बिंदू आहे याचा संबंध माझ्या मते अनाहत नादाच्या अतिंद्रिय, अतिमानस अनुभूतीशी असावा. (कारण मौन मैफिलीला माझ्या मते तिकीट काढून कुणीही येणार नाही.) या विषयी मी काही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. हा अनुभव रमण महर्षी सारख्या मनोनाश झालेल्या, निर्वासना चित्त असलेल्या तुर्यातीत अवस्थेतल्या ज्ञान्यानसाठीच. तो असेल तर आहत नादाची गरजच उरत नाही. काही ना काही ऐकायची/ वाजवायची गरज आहे, तशी उर्मी येते (गीतेच्या परिभाषेत रजोगुण जागा आहे) तोवर असली मल्लिनाथी करणे मज पामरासाठी तरी 'रावसाहेबी' भाषेत उगाच उंच उडी मारून उंटाच्या शेपटाच्या बुडाचा मुका घेण्यासारखे आहे.