गोंदवलेकर महाराज म्हणत - "माणसाला राग असावा, द्वेष असू नये". आपण किमान वैचारिक संघर्ष व्यक्तिगत आकसाकडे वळत नाही इतके जमवून आणले तरी पुरेसे आहे. 'राग असावा' याचा अर्थ आपल्या जीवननिष्ठांचा कुणी अनादर केला तर प्रत्युत्तर द्यावे, अन्यायाचा आणि शोषणाचा आपल्या मर्यादा ओळखत प्रतिकार करावा असा होतो. ते करूनही व्यक्तिगत आकस टाळणे ही एक खुबी अवगत व्हायला हवी. शेवटी पारनेरकर महाराज म्हणतात तशी 'जीवन ही एक कला आहे' आणि मी त्यापुढे जाऊन असे म्हणेन की त्यामुळेच इथला प्रत्येकजण आजन्म विद्यार्थी आहे.
योग्य हेतूविषयी थोडी भर घालतो - मी सध्या संगणक क्षेत्रात चाचणीचे काम करतो. रात्रीचा दिवस करून जी प्रणाली विकसित केली जाते तिच्यात किती चुका आहेत, उणीवा आहेत आणि ती कशी रद्दी आहे हे सप्रमाण दाखवून देणे हे आमचे काम. ते उत्तम दर्जाची प्रणाली बाजारात यावी या दृष्टीनेच केले जाते हे सगळ्याना माहित आहेच. तेव्हा नतद्रष्टपणे केलेली टीका आणि विधायाक टीका यात फरक करण्याचा साक्षेप ठेवायला हवा. हा फरक अभिव्यक्तीपेक्षा आशयावर अवलंबून असतो हे वेगळे सांगायला नकोच.
मी परिपूर्ण आहे, माझे तत्त्वज्ञान परिपूर्ण आहे, मला शिकण्याजोगे, सुधारणा करण्याजोगे काही उरलेच नाही या पैकी कुठलीही भ्रांती बाळगली नाही, तर टीका (मग ती कितीही बोचरी का असेना) खिलाडूपणे घेता येते, टीकाकारालाच धन्यवाद देता येतात. निंदकाचे घर असावे शेजारी असे आरामात म्हणता येते. गुरूतत्व निराकाराइतकेच सर्वव्यापी आहे (याचा अर्थ देही गुरू असूच नयेत असा होत नाही). ते ज्याच्यात लेशमात्रही नाही असा माणूस मला तरी आजवर सापडलेला नाही. साक्षात दत्त महाराजानी अजगरालाच काय वेश्येलाही गुरुस्थानी मानले, तुमची आमची (निदान आमची तरी) काय कथा!. आपण जी विचारधारा मानता/ मांडता, ती एकहार्ट अधिक उत्तम मांडतो हे आपल्याला जाणवले याचाच अर्थ त्याच्यात हे गुरुतत्व अधिक प्रकर्षाने जागृत आहे असा घेणे चूक ठरणार नाही. असो.
आपण मांडलेले या पोस्ट मधील विचार मनापासून आवडले. प्रशासकांचे आभार मानावेत तितके कमीच आहे. आपल्या हातात दंडुका असला तरी तो माफक प्रमाणातच, योग्य तेथेच कसा वापरावा हे त्यांच्याकडून शिकण्याजोगे आहे.