सर्वसामान्यांची जीवन निरंतर, अखंड आनंदयात्राच असावी अशी अपेक्षा सहसा नसते. त्यांची टक्केटोणपे खाणे, चार गोष्टी ऐकून घेणे, सुनावणे या बद्दल मानसिक तयारी असते. अशी अवास्तव अपेक्षा एखाद्याने ठेवली तर एक तर एकांतात राहावे लागेल, नाही तर काही पथ्ये पाळावी लागतील. उदा. उपरोधाला निमंत्रण देणारे अतिरंजित, अवास्तव दावे टाळणे. ठराविक भावदशेत अशा गोष्टी बोलल्या जातात खर्या पण ही भावदशा व्यक्तिगत अनूभूती आहे (गुंगे का गुड आहे) हे भान ठेवायला हवे.
एखाद्या मान्यताप्राप्त ग्रंथ, विचारप्रणाली बद्दल मंडळी भावूक होतात. हे माहित असूनही अनुदार बोलणे अथवा तसे बोलणार्याला प्रोत्साहित करणे आणि त्याला धाडस असे गौरवणे कलहाला आमंत्रणच आहे. असे करताना आपण जे काही करतो त्याने समाजाचे भले होणार आहे, तो दिव्यत्वाकडे वाटचाल करणार आहे याची खात्री असेल तर आपल्या अखंड आनंदावस्थेचे फाजील स्तोम न माजवता, आपल्या शान्त उदात्त वगैरे प्रतिमेला संभाळत न बसता थोडीफार झळ सोसावी लागेल. हे ज्ञानदेव, तुकारामांच्या महाराष्ट्रात नव्याने सांगण्याची गरजच नाही. आपल्याला ध्यानावस्था, आत्मानंद असली काही अमूल्य प्रचिती आली की आई तान्हुल्याला संभाळते, कलाकार आपल्या वाद्यांची काळजी घेतात तशी ती अवस्था सुरुवातीला आपोआप संभाळली जाते. तसे कुणी सांगावे, सुचवावे लागत नाही कारण हा निसर्गच आहे. मग पुढे जाऊन ती निरंतर झाली की आपले हित तर झाले, मग समाजासाठी अनासक्त, निर्लेप वृत्तीने वाटेल ते करता येते. सन्स्कृतातली गीता तोकडी वाटेल अशी टीका (भाष्य) मराठीत लिहिता येते. सहाव्या अध्यायात 'कुंडलिनी' योगासारखी मौलीक भर घालता येते. पाच पैसे पण जवळ न बाळगणार्या सन्न्याशाला भारतासारख्या खंडप्राय देशाची पायी यात्रा करून चार पीठांची स्थापना करता येते, तीही अवघ्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यात! हाच आर्वीकरान्नी मुक्तकंठाने गौरवलेला संतधर्म आहे. असा क्रम नसेल, तर हमरीतुमरीवर येणे अथवा एखाद्यावर वैचारिक बहिष्कार टाकणे अशी वेळ यायचीच. असो. हे जे लिहिले आहे ते मलाही लागू होतेच. ही टीका या अर्थाने न घेता चर्चेच्या विषयासंदर्भात थोडी भर घालण्याचा एक प्रयत्न या अर्थाने घ्यावी अशी नम्र विनंती. बाकी चू. भू. दे. घे.