तर या बॅकग्राउंडवर मला असं वाटतं की सर्वांना असं रहायला जमलं तर
आपला हेतू चांगला असेल, तरी ही अवास्तव अपेक्षा आहे. प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो. स्थळ, काळ आणि परिस्थितीची बंधने असतात. एक टोकाचे उदाहरण द्यायचे तर सियाचेन मध्ये जिथे दूरवरचे दिसत नाही, आणि कधीही हल्ला होउ शकेल अशा परिस्थितीत आपली कर्तव्य निभावणारा जवान असे निरंजनाचे जिणे वगैरे तशी आवड असेल तरी जगूच शकणार नाही. आपण म्हणाल सगळेच माझ्यासारखे होतील तर त्या जवानाची गरजच उरणार नाही तर हे फक्त तर्काच्या पातळीवर बरोबर, आणि वस्तुस्थितीच्या संदर्भात भोंगळ स्वप्नरंजन ठरेल. शिवाय आपण ज्या जीवनशैलीत आनंदी, समाधानी आहात ती एखाद्याला शिक्षा वाटेल ही शक्यता तिचे आग्रही प्रतिपादन करताना लक्षात घ्यावी लागेल. आपल्यासारखा पिंड असणारा तिकडे आकृष्ट होइलच, बाकीचे बदलणार नाहीत. आपण त्याना फारफार तर तेवढ्यापुरते/ कदाचित कायमचे निरुत्तर करू शकाल हे अवश्य लक्षात घ्या.
गीता, कुराण, उपनिषदं, बायबल, झेन, ताओ, भक्तीमार्ग, तंत्रसूत्र, बुद्ध, महावीर, सूफीझम, आज मितीला उपलब्ध असणाऱ्या सर्व ध्यान प्रक्रिया
थोडे परखड मत व्यक्त करतो. ही यादी 'ओशो साहित्य' विषयांची आहे. ओशो वाचून हे सारे (भरीला सार्त्र, नीत्शे वगैरे विचारवंत जमातपण) समजले असे म्हणणे '२१ अपेक्षित' वाचून उत्तीर्ण व्हायचे (आळशी लोकांचा राजयोग), आणि बोर्डात आलो अशी समजूत करून घेण्यासारखे आहे. आजमितीला असा गोड गैरसमज असलेले कित्येक जण माझ्या ओळखीत आहेत. ओशोन्च्या त्यांच्या सवडीशास्त्रानुसारच्या ' मी कुणाचा अनुयायी नाही, मी कुणाला उपदेश देत नाही' सारख्या धारणान्सकट आपल्या सवडीशास्त्रानुसार फॉलो करण्याचा हा खरोखर मजेशीर प्रकार आहे. शिवाय सैद्धांतिक पातळीवर आकलन करून घेणे आणि 'एक तरी ओवी अनुभवावी' अशी प्रत्यक्ष अनुभूती असते त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. विचारातली सुस्पष्टता अशा अनेकविध प्रणालींच्या समग्र आकलनाने येउ शकते, तसेच त्यांची आपल्या सोयीनुसार सवडीशास्त्राप्रमाणे मांडणी करून आणि इतराना निरुत्तर करेल असा एखादा तर्क जोडीला ठेउन ती आणता येते, तसेच अन्य कित्येक मार्गानी (उदा. गुरूकृपा) ती येउ शकते. असो. आपण दिलेल्या यादी पैकी एखाद्या मार्गाचे साधक/ उपासक सगळे सोडून निवान्त होतील असे कालत्रयी होणे नाही. कुंडलिनी विषयी कुंडलिनी जागृतीचा अनुभव असणाराच काही मौलिक असे लिहू शकेल. मला त्यात रस नाही असे म्हणणे वेगळे. त्या मार्गाला जाणेच चूक असे प्रतिपादन कराल तर काही लोक दुखावले जातात. माझे व्यक्तिगत मत मांडले, तेच बरोबर असा आग्रह नाही. असो.
लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे माझ्या सत्याच्या आकलनात काही फरक पडत नाही किंवा स्वच्छंद जगण्यात काही अंतर पडत नाही.
याच नाण्याची दुसरी बाजू अशी, की तुम्ही सत्याचा उदघोष करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी लोकानाही विशेष फरक पडत नाही. तसा पिंड असलेल्याची भक्ती उणावत नाही की विधिनिषेध पाळणारा कुणी स्वच्छंद जगायला लागत नाही.
आपल्या व्यक्तिगत, व्यावसायिक जीवनातील यशाला, समाधानाला मनापासून दाद देतो. ज्या सदहेतू, सदभावाने ही चर्चा आपण सुरू केली त्याबद्दल आदरभाव व्यक्त करून हे चार शब्द संपवतो. इति लेखनसीमा.