ज्या क्षणी माझी जाणीव परत माझ्याप्रत आली त्या क्षणी मला तुम्हाला अपेक्षीत असलेला एक तरी ओवी अनुभवावी हा अनुभव आलेला आहे त्यामुळेच विचारात, मांडणीत, प्रश्न सोडवण्यात  आणि जगण्यात एकसूत्रता आली आहे तुम्ही म्हणता तशी वाचनामुळे नाही. जास्त वाचनामुळे माणूस आणखी आणखी गोंधळात पडत जातो आणि त्याला प्रश्न पडल्यावर तो स्मृतीतून उत्तर शोधायला लागतो. त्याला इथे काय म्हंटले आहे, तिथे काय लिहीले आहे हे आठवायला लागते प्रश्न तर सुटत नाही आणि जीवन परत जसेच्या तसे राहते.

मी जे अध्यात्मिक वाचन आणि चिंतन केले आहे त्यात मी जवळ एक दीड दशके घालवली आहेत तुमच्या कल्पने प्रमाणे अपेक्षीत प्रश्नसंच सोडवून बोर्डात येणे वगैरे घडलेलं नाही. तुमच्या माहितीतल्या लोकांना तुम्ही जरूर मनोगतवर लिहीण्याचा आग्रह करा मग तुम्हाला त्यांचं आकलन लक्षात येईल. मी किती वाचलं हे महत्त्वाचं नाही तर मी अनेक वर्षापूर्वी वाचन थांबवलं हे महत्त्वाचं आहे कारण मला हे लक्षात आलं की सत्य एक आहे. या शिवाय मला कोणतंही उत्तर द्यायला कुणाही महाराजाची काहीही महती सांगावी लागत नाही, प्रत्येक उत्तर हे माझं वैयक्तीक असतं आणि ते माझ्या बोधातून आलेलं असतं हे तुमच्या एव्हाना लक्षात आलं असेल.   

तुमची खरंच लेखनसीमा झाली असेल तर सगळ्या साधकांना उपयोगी होईल असा एक विनोद सांगतो.

माझा एक जवळचा मित्र मला म्हणाला अरे जगात इतका अध्यात्मिक गोंधळ आहे तू याची थोडक्यात सोडवणूक कशी करशील?

 मी त्याला म्हणालो अरे ते फार सोपं आहे गाढव चालावं म्हणून त्याचा मालक एक सोपी युक्ती करतो हे लहानपणी तू पुस्तकातल्या चित्रात पाहिलं असशील. मालक काठीला गाजर बांधून गाढवाच्या दोन कानांमधून ती काठी बरोबर त्याच्या डोळ्यांसमोर पण थोडी दूर धरून गाढवावर बसतो, आता गाजर मिळेल, मग मिळेल या आशेनी गाढव चालत राहतं आणि गाजर आणि गाढव यातलं अंतर नेहेमी कायम रहातं!

मित्र म्हणाला याचा काय संबंध?

मी म्हणालो माणसाची परिस्थिती गाढवापेक्षा ही दारूण आहे.

तो म्हणाला ती कशी?

तर मी म्हणालो : गाढवाचं गाजर तरी मालकानी धरलंय पण प्रत्येक माणसानी स्वतःचं स्वतंत्र गाजर तयार केलंय आणि स्वतःच ते गाजर धरलंय!  त्याला वाटतंय की आता पोहोचलोच सत्याप्रत, एवढं झालं की झालाच साक्षात्कार, हे गाजर सत्यपुढे केंव्हा तरी मिळेल, अमक्याची कृपा झाल्यावर मिळेल, तमका अनुभव आल्यावर मिळेल अशा वाटण्याचं आहे आणि मजा म्हणजे तो स्वतःच सत्य आहे! 

संजय