सौरभ,

कल्पना आणि रहस्य यात फार बेसिक फरक आहे. जे नाही त्याचा विचार किंवा त्याच्या शक्यते बद्दलचा विचार म्हणजे कल्पना आणि जे आत्ता इथे उपभोगाला उपलब्ध आहे ते रहस्य. कवी कल्पना करतो ज्ञानी आहे ते कल्पकतेनी भोगतो. म्हणजे तुमची बायको तुमच्या बरोबर आहे पण तुम्ही तिच्यात रस न घेता उगाच ही कशी असेल ती कशी असेल असा विचार करत बसता ती कल्पना आणि  बायको हीच आपली सखी म्हणून तुम्ही तिला घेऊन फिरायला निघता आणि मग जो वातावरणाचा नूर बदलतो ते रहस्य! चंद्रावर काय असेल आणि मंगळावर माणूस असेल का ही कल्पना आणि माझ्या या घरात आत्ता इथे मी जर आहे ते समग्रतेनी आणि कृतज्ञतेनी स्विकारलं तर जी मजा सुरू होते ते रहस्य!

दारुपूर्वी मला लग्नावर लिहायचं आहे, मधे बहुदा कुंडलिनी योगावर लिहीण्याची जोरदार फर्माईश होईल पण तो क्रियायोग (शरिरीक क्रियेतून निराकाराचा वेध) असल्यामुळे त्यात फार भानगडी आहेत. अर्थात मी तो सहज आणि सोपा करू शकतो पण मला त्यात फारसा रस नाही म्हणून मी त्याच्यावर मोफत बोलणार नाही. भक्तीयोग मात्र विनोदाचा विषय होऊ शकतो त्यामुळे एखादे वेळी मी त्यावर सविस्तर लिहीण्याची शक्यता आहे. 

सध्या दारुबद्दल एवढंच सांगतो की दारू हा निराकाराशी संलग्न होण्याचा माणसानी शोधलेला सोपा आणि सर्वांना सहज उपलब्ध असलेला पर्याय आहे. दारू चढल्यावर वाटणारा अल्हाद आणि निराकार गवसल्यावर वाटणारा अल्हाद सारखा आहे म्हणून दारू लोकप्रिय आहे. तो अल्हाद सृजनात्मक आहे म्हणून बहुतेक कलाकारांना घ्यावी लागते, त्या अल्हादात तुम्हाला सगळं उधळून टाकावं असं वाटतं कारण ती अस्तित्वाची मूळ प्रेरणा आहे. दारू गर्तेत नेते निराकार दिवसें दिवस आधिक आकाशी होत जातो. दारू शरीर आणि मनावर परिणाम करते, निरकार तुमच्यावर परिणाम करतो कारण निराकार ही अल्टीमेट नशा आहे.

संजय