बहुसंख्य भारतीय समाज हा मानसिक दौर्बल्याने पछाडलेला आहे असे माझे मत आहे. स्वतंत्र विचार करण्याची शक्ती फार थोड्या लोकांकडे उरली आहे. अनेक वर्षांची गुलामी आणि पूर्वापार चालत आलेल्या व्यक्तिपूजेच्या सवयींनी आता घातक रुप घेतलं असून लोक कोणाचंही अनुकरण करू लागले आहेत. आपल्याला दिसत असलेल्या किंवा दाखवल्या गेलेल्या गोष्टींतून काय घ्यावं आणि काय टाकावं हा नीरक्षीरविवेक नसल्यामुळे चित्रपटांतून आणि इतर माध्यमांतून रंगवलेल्या कोणत्याही गोष्टींचं अंधानुकरण केलं जात आहे.
त्यात भारतीय जीवनपद्धती आणि पाश्चात्य जीवनपद्धती या दोन टोकांमध्ये अडकून बहुतेक लोकांची कुतरओढ होत आहे. त्यातूनच मग काय केलं पाहिजे हे न कळल्याने कोणातरी तथाकथित उत्सवमूर्तींचं अनुकरण करण्याची वृत्ती बळावते.
नुसतं पुस्तकी शिक्षण न देता जगण्याचा संस्कार देणे, विचार करण्याची सवय लावणे आणि मूल्यशिक्षण हेच यावर औषध आहे.