डोक्यात विचार येऊ नये म्हणून स्वतःला गुंतवून टाकायचं ना?
आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे कानाडोळा करायचा, लहान मुलींवर होणारे अत्याचार, खानदान की इज्जतच्या नावाखाली स्वतःच्याच मुलांचा खून करणारे लोक, शाळा नामक कोंडवाड्यात दबून गेलेली आणि प्रसंगी जीव देणारी कोवळी मुले, नोकऱ्या गेल्याने किंवा मिळूच न शकल्याने निरुद्देश जगणारे आणि व्यसनी झालेले तरूण, झाडं आणि प्राणी यांची होणारी कत्तल, नष्ट होणारे जीव, अन्न पाण्याच्या भीषण टंचाईच्या काठावर पोचलेले जग हे सगळं रिकामटेकड्या लोकांच्या कल्पनेचे खेळ आहेत. तिकडे दुर्लक्ष करायचं आणि फक्त स्वतःचे दिवस रंगतदार कसे होतील ते बघायचं. आपण सुखवस्तू मध्यमवर्गीय आहोत त्यामुळे सगळ्यापासून अलिप्त राहायचं. पुढे आपल्या मुलाबाळांचं ही जे व्हायचंय ते त्यांचं ते बघून घेतील. आपण आपलं स्वतः पुरतं बघावं.
"गोली मार भेजे में, भेजा शोर करता है" हे संत वचन लक्षात ठेवायचं. ही "गोली" मग कशाचीही असू शकते, अफूची, बंदूकीची, छंदांची, उद्योगाची किंवा स्वयंतुष्ट दांभिक अध्यात्माचीही. अशी एक गोळी लावायची आणि सुशेगात राहायचं.
ज्या लोकांना असे छंदाचे चोचले करण्याइतके आर्थिक, सामजिक स्वास्थ्य नाही त्यांनी जगावं किंवा मरावं, आपल्याला काय?
जगात एक अब्जाहून जास्त लोकांना प्यायचं शुद्ध पाणी नाही. दोन अब्जांहून जास्त लोकाना वापरायला पुरेसं पाणी मिळत नाही. त्याचा विचार करणारे आणि त्यासाठी काही करू पाहणारे लोक त्यांचा वेळ जात नाही म्हणून असले उद्योग करतात. आपण त्यात पडायचं नाही.