तुम्ही काय करता हे महत्त्वाचे नाही तर सहलीला गेल्यासारख्या मनोदशेत असता का हे महत्त्वाचे आहे हा सल्ला मात्र पटला नाही. सगळीच जनता टेबल टेनीस आणि तबला वादन अशा छंदात रमत नाही. मंडळी पनवेलच्या बार मध्ये, गुत्त्यात, कल्याण बाजार मध्ये 'लंगडा' येणार का अशा गोष्टीत रमून जीवनात धमाल आणतात. त्यांच्या बायकामुलांच्या जीवनात जी धमाल येते ती मात्र बघवत नाही. म्हणूनच 'जीवन ही कला आहे', कलात्मकपणे जगून आनंदनिर्मिती करणे हाच मूळ हेतू आहे असे सांगणारे पूर्णवाद प्रणेते पारनेरकर महाराज पाठोपाठ 'नीती म्हणजेच माणूस' तिच्याविना माणूस पशुतुल्य आहे हे बजावायला विसरत नाहीत तेव्हा ते भावते. (पुन्हा महाराज आले, माफी चाहतो!)
आता थोडे आमच्या लाडक्या ओशो यांच्याबद्दल. (प्रस्तुत लेखक हे कुणाचेही गुरू आणि अनुयायी नाहीत त्यामुळे ही त्यांच्यावर टीका नाही हे वेगळे सांगायला नको. ) 'आत्ता आणि इथे' सत्य उपलब्ध आहे असे साहित्यिक प्रलाप काढणार्या या माणसाने मागच्या जन्मीचे दाखले देत एका शिष्येला पटवले. (कधी कुठला फंडा वापरावा हे असे उमजणे हीच 'सर्वज्ञता') ही पुढे अमली पदार्थाचे प्रमाणाबाहेर सेवन केल्याने 'गूढ परिस्थितीत' मृत झालेली आढळली. वातानुकुलीत कक्षात आपले भगतगण गोळा करून अकलेचे तारे तोडत जन्म काढला. कुठलीच जीवननिष्ठा नाही, कसलीच जबाबदारी, उत्तरदायित्व घेण्याची तयारी नाही. तर्काला सवडीशास्त्रानुसार वेडेवाकडे वळवून आव्हान देणार्याला खजिल करण्यात मात्र हे भलतेच पटाईत होते. पुण्यात कम्यून असूनही वैश्विक कल्याण घडावे या वेडगळ महत्त्वाकांक्षेपायी (संदर्भ - चंद्रावर जाणे वगैरे) त्यानी शिष्याना अमेरिकेत मोठ्ठे कम्यून निर्माण करण्याच्या कामाला लावले. तिथे काय सत्यानाश झाला हे तर उघडच आहे. असो. कबीर 'ज्यो की त्यो धर दीनी चदरिया' म्हणतात तेव्हा तशी चित्तशुद्धी त्यानी साधलेली असते. बांडगुळासारखा परकमाईवर ऐशोआरामात जगणारा हा बुवा कित्येकांच्या जीवनाचे मातेरे करून गेला. 'दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये' हेच खरे. मी फार निरागसपणे जगलो अशा थाटात कधी जन्मलो नाही, मेलो नाही फक्त एक सहल केली असे या महाराजानी समाधीवर कोरून घेणे हा लई मोठा इनोद आहे. मी उगाचच पैदा झालो, सहलीला गेलो. जाताना बीअर चे क्रेट, भेळेचे सामान घेऊन आणि माणिकचंद ची माळ गळ्यात घालूनच गेलो. मस्त धमाल केली आणि जिथे सहलीला गेलो तिथे भरपूर घाण करून तिथून नदारद झालो ही पण एक सहलच!