१. सहल आणि वारी यातील फरक मला व्यवस्थित समजतो. तो फ्युजन आणि ध्रुपद मधल्या फरकासारखाच आहे. तेव्हा लेखाचे नाव बदलून काडिमात्र फरक पडला नसता.
२. माझे वैयक्तिक अनुभवविश्व बरेच समृद्ध आहे. तरीही फक्त वैयक्तिक अनुभवच खरे असे माझे मत/ अनुभव नाही. माहितीचा साठा (नॉलेज बेस) कुठे वापरावा, आत्मप्रचितीच कोठे प्रमाण मानावी, पुर्वासुरींचा आदर्श कोठे ठेवावा, अंत:प्रेरणेने कधी वागावे हे ठरवणारा विवेक जागा ठेवायचा प्रयत्न करावा असे मी स्वानुभवानेच सांगतो. असे वैचारिक मतभेद कुणी व्यक्त केले तर ते 'मला आव्हान' असे न घेता निर्वैयक्तीकपणे घ्यायला काय हरकत आहे?
३. ओशोंच्या जीवनाची जबाबदारी मी आपणावर कधी टाकली? ती नाही हे मी स्पष्टपणे लिहीले आहे. आपण उच्चरवाने जे प्रतिपादन/ उद्घोष वगैरे करतो त्याची तरी जबाबदारी आपण घ्यावी की नाही? ओशोनी कधीचेच त्यांचे 'शरीर सोडले'. त्यांच्या भंपक विचारसरणीचा बराच पगडा आजही आहे, तिला असलेला माझा विरोध मी इथे नोंदवला यात काय गैर आहे? श्री. यशवंत जोशी आणि त्यांचे चाहते असे हितगुज चालू असताना मंडळी गीतेवर, श्रीहरिवर घसरली ते मात्र धाडस! हा अजब न्याय आहे. मनोगत एक मुक्त व्यासपीठ आहे . अमुक एक निराकारी बाबा आणि त्यांचे भगतगण यांचा अड्डा नाही. मी लिहीलेले गैर/ काहीच्याबाहीच असल्यास ते संपादित करण्याचा प्रशासकाना पूर्ण हक्क आहे, तसेच ते खोडून काढण्याचा इतर मनोगतीना हक्क आहे. माझा मुळीच आक्षेप नाही.
४. मानवी मन टिपकागदासारखे असते, तसेच ते एकसमयावच्छेदेकरून तरल आणि मजबूत बांधणीचे दोन्ही असते. त्यामुळे आपण जे काही वाचू त्याचा बुद्धिभेद होणे, वासना चाळवणे, अभिरूची उंचावणे, अनैतिकतेचे उदात्तीकरण होणे, सृजनशीलतेला प्रोत्साहन मिळणे असा वाटेल तसा परिणाम होऊ शकतो. ते जर सर्वथा व्यर्थ असते तर मनोगतावर वैचारिक लिखाण करण्यात तरी काय मतलब आहे? मी इथे जे लिहीतो त्याचा मर्यादित का होईना परिणाम होतो हे मला नेमके आणि पक्के ठाऊक आहे. असो.
५. "ते तुमच्या [अल्पस्वल्प] बुद्धीमत्तेनी (किंवा [विनोदी] भक्तीरसानी) सुधारण्याचा प्रयत्न केलात तर जास्त विधायक होईल" - मी तितका मोठा नाही. सर्वसामान्य आहे. मी फक्त आपले मत मांडू शकतो. ही कलमबहाद्दुरी असेल तर ती माध्यमाची मर्यादा आहे. इथे बाकी मनोगती (ज्यात आपण तर ज्येष्ठ आहात) आणखी अशी कुठली बहाद्दुरी गाजवून राहिले आहेत की मी खजिल व्हावे? पुन्हा असो.