विजय आणि आशुतोश साहेब,

आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. रियालिटी शो पाहताना (मग तो कॉमेडी असो किंवा आणखी काही) काही गोष्टी इतक्या मूर्खासारख्या प्लॅन केलेल्या वाटतात की त्यावर विश्वास ठेवावा का नाही हे ठरवताच येत नाही. चांगली कॉमेडी हल्ली ऐकायला किंवा बघायला मिळत नाही हे दुर्दैवं आहे. ओढून ताणून केलेले बाष्कळ विनोद, काहीही कारण नसताना बॅग्राउंडला असलेले हास्य आणि ज्या माणसाला दर्जेदार कॉमेडीचा (वाचनाचा किंवा  पाहण्याचा) कोणत्याही प्रकारचा अजिबात अनुभव नाही अशा माणसानं दिलेली उत्स्फूर्त दाद ही बहुदा कॉमेडीची नवी व्याख्या असावी. तसंच दर्जेदार विनोदी किंवा गंभीर असं लिखाणही आता आभावानंच आढळतं. जिथे दर्जेदार लिखाणाला आणि वाचनालाच ओहोटी लागलेली आहे तिथे चांगल्या कार्यक्रमांची अपेक्षा काय करणार? मुळात अशा कार्यक्रमांचा जाहीर निषेध करायला हवा. तुम्ही दाखवताय ते अतिशय हीन दर्जाचं आहे असं आपल्याला या लोकांना (चेनेल वाल्यांना) सांगता आलं पाहीजे. अर्थात हे सांगून फार सुधारण्याची अपेक्षा करता येत नाही. पण निदान आपण निषेध नोंदवला हे एक समाधान तरी मिळेल. वेळीच अशा कार्यक्रमांना आळा घातला नाही तर आपल्या पुढची पिढी हेच टुकार कार्यक्रम दर्जेदार आहेत असं समजू लागेल आणि पुलं, मिरासदार, अत्रे, चि. वी. जोशी यांना आपण ओळखत नाही असं सांगायला मागे पुढे पाहणार नाही.

थोडं अवांतर  विनोदी कार्यक्रमांची बोंबाबोंब आहेच. पण अजून एक चीड आणणारा कार्यक्रम म्हणजे आत्ताचं सारेगमपं. यापूर्वीचं लिटल चॅंप्स सारेगम खरचं छान होतं. पण आता जे काही चालू आहे ते म्हणजे डोक्यावरून पाणी. जी मुलं हारलेली आहेत त्यांना परत बोलावून पुन्हा कार्यक्रम चालू करणं म्हणजे नापास झालेल्याना पास करण्यासारखं आहे. जरी काही वेळा ही मुलं एखादं गाणं अतिशय निकृष्ट दर्जाचं म्हणत असल्याचं स्पष्ट दिसत असलं तरीही त्या मुलांच्या टॅलेंटवर मला शंका घ्यायची नाही. पण त्यांचं उगाचच होणारं अति कौतुक (थोडं करायला आमची हरकत नाही) आणि पल्लवी जोशी बाईंचं 'क्या बात है! टाळ्या झाल्या पाहिजेत!' हे ऐकून आता अपचन होऊ लागलं आहे. जर चॅनलकडे नवीन चांगले कार्यक्रम नसतील तर गजरा, आव्हान, चाळ नावाची वाचाळ वस्ती, असे पाहुणे येती असे जुने कार्यक्रम किंवा जुनी समूहगीतं जरी दाखवली तरी लोकांना बघायला आवडतील. सह्याद्री वाहिनीनं हा प्रयोग यशस्वीपणे केला आणि त्यामुळे 'सह्याद्रीच्या पाऊलखुणा' सगळ्यांना रुचलं. झी मराठी वर देखील हा प्रयोग झालेला आहे आणि चांगले प्रयोग पुन्हा पुन्हा करायला काहीच हरकत नाही. जर तसे प्रयोगही करायचे नसतील तर काही काळ वाहिनीवर चक्क पूर्वी यायच्या तश्या मुंग्या आणाव्यात. त्या निमितानं प्रेक्षक थोडा वेळ टीव्ही बंद करून गप्पा वगैरे मारू शकतील.  

एक माहिती म्हणून सांगतो. अगदीच डोकं बाजूला काढून दिवसाच्या कुठल्याही वेळी ऑर्डिनरी थर्डक्लास कॉमेडी पाहायची असेल तर कोणताही हिंदी न्यूज चॅनल पाहा. त्यातही मुख्यत्वेकरून स्टार न्यूज आणि आज तक. वेड लागेल वेड.    

असो. कितीही लिहिलं तरी कमीच आहे. इथेच थांबतो.  

धन्यवाद, दिलसे.