विजय देशमुख,

परस्परांचा परिचय नसणाऱ्या दोन व्यक्ती प्रथमच भेटत असतील तर प्रत्येक भाषेतच आदरार्थी संबोधण्याचा संकेत आहे. नंतर जेव्हा ओळख दाट होत जाते तेव्हा औपचारिकतेची बंधने गळून पडतात. इंग्रजी संभाषणात पण प्रथमच एकमेकांना 'हॅलो' म्हणतात, पण पुढच्या वेळेपासून 'हाय' म्हणायला हरकत नसते.

संबोधनाबाबतही भाषांमध्ये गंमत असते. हिंदीमध्ये ही अदब अधिक काळजीपूर्वक सांभाळली जाते. तुमची ओळख करून देताना यजमान आम्हाला सांगतील 'आप है विजयजी देशमुख आजके हमारे समारोह के भवदीय अतिथी'. मराठीत तुम्ही विजयराव व्हाल. गुजराथीत विजयभाई, बंगालीत बिजोयबाबू, तमिळमध्ये थिरू विजय. कोकणी वगळता कोणत्याही भाषेत पहिल्या फटक्यात सलगी केली जात नाही आणि कोकणीसुद्धा इतकी गोड बोली आहे, की तिच्यातील अकृत्रिम जिव्हाळ्याला कुणीही हरकत घेत नाही. त्यामुळे कोकणातला किंवा गोव्याकडचा माणूस पहिल्याच भेटीत तुम्हाला खुशाल म्हणेल, 'देशमुखांचो विजय काय रे तू? खयचा रे तू?' पुढे जेव्हा तुमची सलगी होते तेव्हा तुमच्या नावापुढे 'मेल्या' हे संबोधन लागते. ग्रामीण भागातले लोक विजयभाऊ, विजयदादा असे म्हणून आपुलकी दाखवतात. पण या सगळयात एक मजा आहे. नुसत्या नावाने हाक मारून ती का घालवायची?

बरं जीवनात कधी ना कधी आपल्यालाही औपचारिकता पाळावीच लागते. उद्या मला माझ्या मुलामुलीच्या विवाहाची पत्रिका माझ्या जवळच्या मित्राला पाठवायची आहे तर त्यावर मला 'रा. रा. संतोषराव. विवाहास अगत्य येणे करावे' असेच लिहावे लागते. तिथे 'संत्या रांड्या, ये नायतर पायताणानं मारीन' अशी रोजची भाषा वापरून नाही चालणार.