१. शिवकुमार शर्मा आणि झाकीर हुसेन यांचें सहवादन अप्रतिम आहे. कलावंत जसजसाप्रगल्भ होत जातो तसतसा तो अधिक विनयशील आणि शालीन होतो. सहवादनांत दोन्हीं वादक स्वरानंदाच्या प्रवासाला लागलेले असतात आणि दोघेही मिळून तो आनंद घेतात. एकेक सादरीकरण हा एकेक प्रयोग असतो. कधीं जमतो तर कधीं फसतो. स्वरसौंदर्य आणि तालाच्या प्रवासातील मोहक क्षण सांपडल्याचा आणि प्रयोग जमल्याचा आनंद झाकीर हुसेनच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे. इथें त्याचा उद्देश शिवजीची टोपी उडवणें हा नसून दोघांनीं मिळून संगीतसाम्राज्यातील सौंदर्याचा आनंद दोघांनीं मिळून लुटणें आणि श्रोत्यांना देणें हा आहे. झाकीरच्या चेहऱ्यावरील भाव तस्सेच निर्मळ आहेत.
२. पहिल्या भागांत शुभम महाराज यांबद्दल
कुठल्याही मुष्किल तालात, कुठल्याही मात्रेपासून आड, कुआड लयीत तिहाई घेऊन खाडकन सम गाठणे यात त्यांचा हातखंडा होता. (साथ करत असतील, आणि मुख्य वादक लयतालाला पक्का नसेल, तर त्याची टोपी उडवणारा हा प्रकार आहे)
असा मजकूर आहे. छोट्या आणि कच्च्या कलाकाराची टोपी उडवणें हें प्रगल्भतेचें लक्षण नक्कीच म्हणतां येणार नाहीं.
गायकाला वा वादकाला तो कितीही छोटा असला तरी स्वरानंद लुटायला मदत करणें हा तालवाद्य वादकाचा हेतू असावा. म्हणूनच वसंतराव देशपांडे एकदां तबलजी नाना पाटेकरांना म्हणाले होते कीं तूं चुकलास तर मीं चुकलों असें समज आणि वाजवीत राहा. म्हणूनच मोठे म्हटले गेलेले कलावंत मोठे ठरतात आणि आढ्यतावंत मात्र ती उंची गाठूं शकत नाहींत. मला आठवतें मीं शाळकरी विद्यार्थी असतांना संगीत शिकायला लागून कांहीं आठवडेच झाले असतांना एकदां पाठ सुरुं असतांना सुप्रसिद्ध संवादिनीवादक गोविंदराव पटवर्धन कांहीं कामानिमित्त आले होते. ते प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचें नांव वगैरे विचारून पाठीवर हात ठेवीत व संगीतशिक्षण कधीं सोडूं नकोस असा उपदेश करीत. साध्या कीर्तनकाराला पायपेटीची साथ करतांना ते त्याला गुरुस्थानीं मानीत. टोपी उडवणें तसें सोपेंच आहे. तो एखाद्या शाळकरी गोलंदाजानें सचिन तेंडुलकरचा त्रिफळा उडवण्यासारखा प्रकार आहे. तेव्हां टोपी उडवण्याचें जाणकारांकडून कधींही कौतुक केलें जात नाहीं.
गेल्या भागांत नृत्यासोबत तबलासाथ आहे. ते सर्व श्रोतृवृंद आकर्षित करण्यासाठीं केलेले प्रयोग वाटले. तरी नृत्य आणि जिमनॅस्टिक्स यांतील सीमारेषा कांहीं वेळां धूसर होते तें भान गायनवादनांत ठेवावें लागतें. निव्वळ स्वरचमत्कृती वा तालचमत्कृती म्हणजे संगीत नव्हे. त्यांत सौंदर्याविष्काराचें परिमाण असावेंच लागतें. म्हणून नवोदित गायकाला संगीतशिक्षक हरकती मुरक्या घोटवण्यापेक्षां निखळ, स्थिर सूर लावण्याला जास्त महत्त्व देतात. गळा फिरतो म्हणून उगाच मुरक्या खटके घेऊं नका वा तानबाजी करूं नका असा सल्ला देतात.
असो. या भागांतील मात्र सर्व दुवे झकासच आहेत. या लेखमालेंतून बरीच अमूल्य माहिती मिळाली आणि जो आनंद मिळाला आहे तो अवर्णनीय आहे. धन्यवाद द्यावेत तितके थोडेच.
प्रतिसाद वाजवीपेक्षां लांबल्याबद्दल क्षमस्व
सुधीर कांदळकर