(साऱ्या महाजनांची क्षमा मागून)
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ (२. ६९)
या श्लोकाच्या अर्थाचा विषय समोर आला. त्यावर विचार करत होतो. गीतार्थ सांगणाऱ्या ग्रंथांतून दिलेला सरळ अर्थ लक्षात घेताना 'जागर्ती’ आणि 'जाग्रती’ ही दोन पदे मेंदूला त्रास देत होती.
‘ह्यॅःह्यॅःह्यॅःह्यॅः... ’ कांहीसा कुत्सित हंसण्याचा हा आवाज कुठून येत होता, हे समजावयास वेळ लागला नाही. माझ्या मनात राहाणारा तो व्रात्य ढंप्या... मी एकटा असताना त्याच्याशिवाय इतकं धारिष्ट्य दाखविणारा अन्य कुणी असणं शक्य नाही... मला माहितंय.
मी जरा चिडूनच म्हणालो, ‘ए गप रे! ’
डोळ्यांच्या कोपऱ्यातून माझ्याकडे तो पाहात जरा गंभीर झाला.
‘काय रे काय झालं खिदळायला? ’
‘नाही... काही नाही... अगदी साध्या सोप्या शब्दांचा अर्थ शोधण्याचा तुझा खटाटोप पाहून हंसू नाही तर काय करू? ’ ढंप्या थोड्या अदबीनं उत्तरला.
‘अरे बाबा, हा श्लोक गीतेतील आहे... गीता किती गूढ अर्थाने भरलीय, माहितंय् ना तुला? ’
‘असेल.. पण हा श्लोक तरी सोपा आहे.. ’
‘हो कां? मग सांग बरं त्याचा अर्थ... ’ मी ढंप्याला आव्हान दिले.
‘निशा म्हणजे रात्र. रात्रीच साऱ्या भूताखेतांना जाग येत असते, हे कांही मी सांगायला नको. या भूतांबद्दल जवळजवळ साऱ्या माणसांना भीती असते. अशी घाबरट माणसं भूत म्हटले की मरणभयानं पछाडले जातात. त्यांना झोप लागत नसते... तुला माहितंय्. ‘सं’ म्हणजे पूर्णपणे आणि ‘यमी’ म्हणजे मरणभयानं घाबरलेला.. ’
‘ए, कांहीतरीच काय सांगतोयस्... यमी म्हणजे घाबरलेला कसा? ’
‘दुःख-दुःखी नाही कां? तसंच... ‘यम’ म्हणजे ‘साक्षात् भीती’... त्यापासून ‘यमी’ बनतो... म्हणजे ‘घाबरलेला’... सोप्पंय्!.. जेव्हा रात्र होते तेव्हा भूतांचे खेळ सुरू झाल्यानं भयग्रस्त माणसं झोप विसरतात, ते झोपू शकत नाहीत, त्यांना जागरणं ठरलेलीच! ’... ढंप्यानं पांडित्य उगाळलं.
मला उत्सुकता वाटू लागली. ‘बरं, दुसऱ्या चरणाचं काय? ’
‘सांगतो ना, तेही तसंच सोपंय्... इथे मुनी म्हणजे ज्याच्या मनात ‘म’- मरणाची भीती ‘उनी’ म्हणजे उणी आहे... म्हणजे, जो अजिबात घाबरत नसतो, तो मुनी. अशी निगरगट्ट माणसं भूतं जरी जागी असली, तरी बिनधास्तपणे स्वप्न पाहावीत, तसं भूतांचे ते खेळ पाहात बसतात, मजा लुटतात!... बस्स्, एवढंच तर या श्लोकात सांगितलंय्! ’ विजयी मुद्रेनं ढंप्या माझ्याकडे सस्मित पाहात होता.
मी निरुत्तर झालो. काय बोलावे ते सुचेना. ‘बरं बरं, फार शहाणपणा नको दाखवूस्... मुकाट राहा... माझं काम मला करू देत्.. ’ मी पुन्हा ग्रंथात शिरलो..