नाती दोन प्रकारची असतात. एक रक्ताची आणि दुसरी जुळलेली. उदा. मैत्री. आपल्याकडे असा (गैर)समज आहे की,
रक्ताच्या नात्यामध्येच प्रेम जिव्हाळा असतो. त्यामुळं ताई/माई/काकू/मावशी/आजी/जी/काका/दादा अशी नात्याची उसनी
संबोधनं लावून आपण प्रेम दाखवायचा प्रयत्न करतो.
विदेशात आई वडील सोडून इतर कुणालाही एकेरी किंवा नावानेच हाक मारण्याची पद्धत आहे. इंग्रजी शब्दकोशातसुद्धा
तुम्ही/तुम्हाला यासाठी वेगळा पर्याय नाही. हिंदीमध्ये मात्र 'पहले आप.. ' ची लखनवी अदब अजूनही काही प्रमाणात आहे.
तिथे आई मुलांना आणि मुलं आईला 'आप' अशी द्वितीयपुरुषी अनेकवचनी हाक मारतात.
संबोधनाच्या आवडीबाबत म्हणाल तर मला वाटतं संबोधन लावण्या/न लावण्याची आवड ही व्यक्तिसापेक्ष नसून स्थळकाळासापेक्ष आहे. उदा. एका सुंदर मुलीसोबत नजरा जुळत असताना नुकतंच तेरावं संपलेली तुमची भाची दूरून माssमाss म्हणून हाक मारते तेव्हा, 'धरणीमाय.. पोटात घे.. ' चा तुमचा आविर्भाव असतो. पण याच भाचीनं थोरामोठ्यांसमोर आपल्याला आदरातिर्थी बोलावं अशी आपली इच्छा असते. किंवा मुलांच्याच शाळेत शिक्षक असणाऱ्या पालकांना मुलं शाळेत त्यांना आपसूकच सर/मॅडम अशीच हाक मारतात,
संबोधन हे फक्त औपचारिक प्रकारातच वापरण्याचा संकेत आहे. त्यामुळं एरव्ही 'विज्या' चा लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर श्री विजयराव होतो.
बाकी काहीही म्हणा जुळलेल्या नात्यामध्ये जे प्रेम असतं ते रक्ताच्या नात्यामध्ये कुठे?
शेवटी कोणती संबोधनं कुठे, कशी, कोणाला आणि किती वापरायची (किंवा न वापरायची) हे जर तुम्हाला कळलं तर तुमचं जीवन अधिक सुखकर होईल. मी मात्र या संबोधनाचा रोजच्या जीवनात भन्नाट वापर करतो. त्यातली एक दोन उदाहरणं इथे देत आहे. बघा तुम्हालाही जमतंय का.
---सहसा मुलींना ताई म्हटलेलं अजिबात आवडत नाही, पण चित्रपटाची तिकिटं काढताना रांगेतल्या सगळ्यात पुढच्या मुलीला ताई म्हणत तिकिटाचे पैसे द्या, मुलीने नकार दिला तर शप्पथ..!
---बसमध्ये चुकून(? ) मुलीला नको तिथे धक्का लागला आणि मुलीचा आप्तस्वकीय तुमची धुलाई करत असेल तर काका मामा म्हणत सुटका करून घेण्याची पद्धत आहे. अजिबात काका मामा म्हणू नका... नाहीतर मुलीसोबत नातं जोडत असल्याच्या कारणावरून जास्त मार खाल.!
---एखाद्या सरकारी कार्यालयात, वैध असूनही अधिकारी तुमची कामं करत नाही. शेवटचा पर्याय म्हणून तुम्हाला ठेवणीतल्या सर्व शिव्या द्याव्याशा वाटतील, अजिबात शिव्या देऊ नका...!! उलट जेवढी काही मानाची संबोधनं असतील तेवढी (उदा. मालीक, मेरे सरकार, हज्युर, मायबाप, अन्नदाता इ. ) थोड्या-थोड्या अंतराने वापरा. अपेक्षीत परिणाम साध्य होईल.....!!!