नावामागे मा. लावणे आणि नंतर जी लावणे म्हणजे हांजीहांजी याशिवाय दुसरे काही नाही. ही लाळघोटेपणाची प्रथा मराठी संस्कृतीत बसत नाही. लोकमान्य टिळक, आगरकर, सावरकर, अत्रे खांडेकर कधीही मा. नव्हते आणि त्यांना कुणी जी चे शेपूट लावून त्यांच्या पुढेमागे लांगूलचालनही केले नव्हते. एका संस्थळावर तर सुरेश भटांना सुरेशजी भटजी केले होते.
कुठल्या स्त्रीचा उल्लेख करताना नावानंतर ताई-बाई लावायचे हे तारतम्याने ठरवावे लागते, अन्यथा त्या बोलण्याला कुजका वास येतो. लता मंगेशकरला लताजी मंगेशकरजी म्हणणे हे, दादोजीजी कोंडदेवजी म्हणण्याइतके हास्यास्पद आहे.
ताई, माई, अक्का, काकू, आजी तसे काका, मामा, आजोबा ही घरगुती आणि अतिशय परिचित व्यक्तींसाठी वापरायची बिरुदे आहेत. राव, साहेब आणि बाई हे साधारणपणे वापरायला सुरक्षित असतात. पण काही नावांना राव शोभत नाही, तर काहींना पंत. बाळ ठाकऱ्यांना बाळराव ठाकरे शोभेल? आणि भीमराव आंबेडकरांना भीमपंत? एक नक्की की, लता, छाया किंवा पुष्पा यांची वये माहीत नसताना त्यांना लताजी, छायाजी किंवा पुष्पाजी करून त्यांच्या कमरेवर नातवंड मारू नये.