जी म्हणजे हांजीहांजी हे विधान काही पटले नाही. प्रत्येक प्रांताची, भाषेची स्वतःची एक अदब असते. हिंदीतील जी संबोधनाला लोचटपणा कशासाठी म्हणावे? मराठीत देवांची नावे एकेरी घ्यायची पद्धत आहे. (धाव रे रामराया, तुजवीण शंभो, गजानना रे गजानना, नारायणा रमारमणा, अंजनीच्या सुता, विठ्ठला तू वेडा कुंभार, प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तरी.. वगैरे) हिंदीत रामजी, शिवजी, गणेशजी, ब्रह्माजी असे म्हणतात. मग ते लोक देवाची हांजी हांजी करतात का?

मराठीत असली काही औपचारिकता नाही, असे म्हणता येत नाही. लहान मुलांची नावे ठेवतानाच त्यात जी लाऊन ठेवण्याची पद्धत आपणही पाळत होतो. मालोजी, विठोजी, शहाजी, शिवाजी, संभाजी, तानाजी, येसाजी, बाजी, चिमणाजी असे कितीतरी दाखले मिळतील. राजघराण्यात आणि खानदानी घरांमध्ये बोलताना अदब सांभाळण्याचे शिक्षण लहानपणापासूनच मिळे. क्वचित प्रसंगी एकेरी नाव जिभेवर आले तरी चारचौघात मासाहेब, बाळराजे, चिरंजीव, कुंवरजी, दादाजी, राजाजी असे म्हणत आणि लहान मुलामुलींनाही अहोजाहो करून बोलवत.

ऐतिहासिक काळात इतर प्रांतांप्रमाणे महाराष्ट्रानेही हा आदराचा संस्कार जपला होता. काही उदाहरणे देतो. बाजीराव आणि चिमाजी ही बाळाजी विश्वनाथांची मुले छत्रपती शाहूंसमोर लहानाची मोठी झाली होती. खासगी भेटीत शाहूराजे या दोघांना राऊ आणि अप्पा या घरगुती नावाने एकेरी संबोधत असले तरी दरबारात मात्र त्यांचा उल्लेख बाजीराव पेशवे आणि चिमणाजीपंत असा करत. हैदराबादचा निजाम आणि माधवराव पेशवे एकमेकांना भेटले तेव्हा संभाषणातही निजाम माधवरावांना संस्कृत अदबीने 'पंडित पंतप्रधान माधवरावजी पेशवे' म्हणाला तर माधवराव त्याला उर्दू पद्धतीने ' बंदगाने अली आला हजरत' असेच म्हणाले.

मोठ्या व्यक्ती स्वतःचा उल्लेख एकेरी आणि कोणत्याही बिरुदाविना करत असत. शिवाजी महाराजांचा शिक्का पाहा. त्यात ते स्वतःला 'शहाजीचा मुलगा शिवाजी' असेच म्हणवून घेतात. बाजीरावाचा शिक्का पहा. तो मराठीत आहे. त्यातही 'शाहू नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान' एवढाच उल्लेख आहे. पण समोरचे लोक मात्र त्या व्यक्तीला यथायोग्य आदर देत. उत्तरेकडील राजपूत, जाट पेशव्यांना 'पेशवासाहिब' म्हणून हाक मारत. मराठी लोक त्यांना 'श्रीमंत पेशवे' म्हणत. आता एकेरी उल्लेख कुठे कुठे होई तर वर म्हटल्याप्रमाणे स्वतःचा उल्लेख स्वतः करायचा असेल तिथे. संतांचे अभंग पाहा. नामा म्हणे, तुका म्हणे, एका जनार्दनी शरण,  असाच त्यात उल्लेख आहे. रामदासांनी आरत्या लिहिल्या त्यातही स्वतःला रामदास किंवा दास एवढेच म्हणवून घेतले आहे. (दास रामाचा वाट पाहे सदना, दास डोंगरी राहतो, रामी रामदासा शक्तीचा बोध इ. ) पण इतर लोक त्यांना 'स्वामी' म्हणत आणि समर्थ ही पदवी लोकांनीच दिली होती. तीही रामदास एकेरीच वापरत (समर्थाचिया सेवका वक्र पाहे). न्यायनिवाड्याच्या पत्रात नाव, टोपणनावाचा उल्लेख एकेरी होत असे (खंडो बीन सखाराम कुलकर्णी याचे वहिवाटीत असलेला मोकासा येणेप्रमाणे). ज्याच्याबद्दल द्वेष, तिरस्कार असे अशा व्यक्तीचा उल्लेख एकेरी नावाने तोही शत्रूकडून होत असे. औरंगजेब कायम शिवाजी महाराजांना 'सिवा', संभाजीराजांना 'संभा' म्हणे, तर रामदासांनी आपल्या रचनेत 'बुडाला औरंग्या पापी' असे म्हटले आहे. चंद्रसेन जाधव बाजीराव पेशव्याला कायम पाण्यात पाहात असे त्यामुळे त्याचा ऊल्लेख 'बाज्या' असा करत असे.

हे सांगायचे कारण एवढेच की 'मराठी भाषेत आदरार्थी संबोधने अशी काही औपचारिकता नाहीच', असे कुणी म्हणू नये. सुबोध, संहिता, सायली, शेफाली, भौमिक, नवनीत, श्रेया, रिया, अनुजा, शाल्मली अशी बंगाली छान छान नावांची फॅशन येण्यापूर्वी मराठी नावेही शंकर, नारायण, राजाराम, अहिल्या, दुर्गा, तारा, गोदावरी अशी साधी साधी होती. एरवी नवऱ्याला जग 'म्हाद्या' म्हणत असले तरी त्याची बायको मात्र नाव घेताना 'महादजीरावांचे नाव घेते' असेच म्हणत असे. नावापुढे राव, पंत, बाई, ताई, अण्णा, अक्का, बापू हे लाऊनच संबोधण्याची प्रथा आतापर्यंत होती (शंकरराव चव्हाण, नारायणराव राजहंस, राजारामबापू पाटील, अहिल्याबाई रांगणेकर, दुर्गाबाई भागवत, ताराबाई वनारसे, गोदूताई परुळेकर). लता मंगेशकर यांना चाहत्यांनी लता अशा एकेरी नावाने हाक मारु देत, पण कधीकाळी त्यांनाही सगळे 'लताबाई' म्हणत होते. आज त्यांना सगळेजण 'दिदी' म्हणतात. आता 'सिर्फ नाम काफी है' असे म्हणणाऱ्यांना जर लता मंगेशकर खरंच समोर आल्या तर ते त्यांना काय नावाने हाक मारतील? 'काय गं लता' असे आपण म्हणू का?

संबोधनांची लांबड लावली तर त्यातून आचरटपणा दिसतो, हे मला मान्य आहे, पण नावापुढे राव, जी, भाऊ, भय्या, दादा, ताई, काका असे एखादे संबोधन असल्यास त्यातून जिव्हाळा प्रतित होतो, असे मला वाटते. अर्थात ओळख घनिष्ट होते तेव्हा हे संबोधनही उरत नाही. लोक नावानेच एकमेकांना हाक मारू लागतात.