शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा ...

असा आहे. हे पाहता ह्या पितापुत्रांची नावे अनुक्रमे शाह आणि शिव अशी असावीत (आणि जी हे त्यापुढे आदराने जोडले जात असावे) असे वाटण्यास जागा आहे. इतर ऐतिहासिक कागदपत्रांतून आणखी माहिती मिळू शकेल असे वाटते.

हे अगदी पटण्यासारखे आहे. शिवाय 'शाहू' आणि 'शहा'(जी) ही नावे एकाच पठडीतील असावीत, अशीही शंका येते.

नक्की खात्री नाही, परंतु शिवाजीमहाराजांना त्यांच्या हयातीतच 'शिवबा' असेही संबोधत नसत काय? (विशेषतः जिजाबाई वगैरे?)

'होता जिवा, म्हणून वाचला शिवा' हा नेमका काय प्रकार आहे? की 'हल्लीच्या विचारपद्धती'स अनुसरून हे उद्धृत किंवा ही म्हण किंवा हे जे काही आहे ते, नंतर कोणा 'आमच्यातल्या' बखरकाराने खोडसाळपणे घुसडले असावे?

(वरचे दोन दाखले जर चुकून योग्य निघालेच, तर असे आणखी किती दाखले पाहिजेत?)

फार कशाला, 'संभा'जी आणि 'शंभू' यांत काही साम्य आढळते काय? (की माझ्याच ब्राह्मणी दृष्टिकोनास ते तसे भासते?) आणि 'शिव', 'शंभू' यांच्यात काही 'पॅटर्न' दिसतो काय? (की मलाच तो तसा पाहण्यास शिकवण्यात आलेले आहे? थोडक्यात, 'पुण्यपत्तन'प्रमाणेच, 'शंभू' हेदेखील 'संभाजी'सारख्या एखाद्या पूर्णपणे असंबद्ध अशा स्थानिक देशी नावाचे संस्कृतीकरण असण्याची शक्यता काय? आणि त्याचप्रमाणे 'शिवाजी'चे 'शिव' आणि 'शहाजी'चे 'शाह' हे आधीच्या पिढीतील - खुद्द शिवाजीमहाराजांच्या हयातीत केलेले - संस्कृतीकरण?)

(वरीलपैकी काही प्रश्नार्थक विधाने ही वक्रोक्तिपूर्ण भासण्यासारखी असली तरी त्यामागे काही प्रामाणिक शंका आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.)
==============================================
तसे पहायला गेले, तर खुद्द शिवाजीमहाराजांच्या हयातीत त्यांच्याच नावाचे 'अधिकृत कार्यांकरिता' संस्कृतीकरण होणे - आणि त्यांनी स्वतः ते वापरणे - हे अगदीच अशक्य नसावे. इतर समाजांतही तशी पद्धत आढळते.

उदाहरणार्थ, 'भो पंचम जॉर्ज भूपा'च्या जमान्यातील हिंदुस्थानातील नाण्यांवर त्याचा नामोल्लेख शुद्ध इंग्रजीत 'GEORGE V KING EMPEROR' असा (दुवा १) होत असे खरा, परंतु त्याच्याच कारकीर्दीतील खुद्द इंग्लंडातील नाण्यांवर मात्र हाच नामोल्लेख स्थानिक (की युरोपीय?) प्रथेप्रमाणे संक्षिप्त लॅटिनमध्ये 'GEORGIVS V DEI GRA: BRITT: OMN: REX FID: DEF: IND: IMP:' (म्हणजे 'जॉर्ज पाचवा, देवाच्या कृपेने समग्र ब्रिटनचा राजा, धर्माचा संरक्षक आणि हिंदुस्थानचा सम्राट') असा (दुवा २) होत असे. येथे 'जॉर्ज'चे 'जॉर्जियस' हे लॅटिनीकरण उल्लेखनीय आहे.

आता, 'जॉर्जियस' हे 'जॉर्ज'चे मूळ लॅटिन रूप आहे, की (बहुधा नंतर लादलेले) नव-लॅटिनीकरण आहे, याबद्दल मला खात्री नाही. याचा तपास करावा लागेल. दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत. परंतु 'जॉर्जियस' हे 'भो पंचम'साहेबांचे पाळण्यातले - किंवा सामान्य व्यवहारातलेसुद्धा - नाव नव्हते, हे निश्चित. (उलटपक्षी, 'मेरी' या नावाचे 'अधिकृत राजव्यवहाराकरिता' उलट-लॅटिनीकरण 'मारिया' असे व्हावे. पण 'मारिया' हे मुळात रोमन नाव नसावे. ते मध्यपूर्वेतील कोण्या सेमिटिकवंशीय नामावलीतील बहुधा 'मरियम'चे लॅटिनीकरण असावे. अशाच प्रकारे काही स्थानिक इंग्रजी नावांचे रोमन साम्राज्याखाली लॅटिनीकरण झालेले असणे - परंतु खुद्द इंग्लंडात मूळ स्वरूप प्रचलित असणे - अशक्य नाही. असो.)

थोडक्यात, शिवाजीमहाराजांच्या राजमुद्रेवरून (१) शिवाजी आणि शहाजी यांची नावे 'शिव' आणि 'शाह' अशी असावीत, किंवा (२) 'शिव' आणि 'शाह' हे 'शिवाजी' आणि 'शहाजी' यांकरिता नंतर लादलेले कृत्रिम संस्कृतीकरण असावे, अशा दोन्ही बाजूंनी तर्क लढवणे शक्य आहे. खात्रीलायक अनुमानासाठी यावर अधिक खोलात शिरून अभ्यास करावा लागेल.
==============================================
बाजीरावाचे बाबतीत मात्र बाजीराव असेच नाव असावे (राव हे आदरार्थी नसावे) असे वाटते.

याबद्दल थोडा साशंक आहे. 'बाजीरावा'तला 'बाजी' हा 'बाजी प्रभू देशपांड्या'तल्या 'बाजी' सारखा असू शकेल काय? त्या परिस्थितीत 'राव' हे आदरार्थी असू शकेल.

आणि तसे असल्यास 'बाजी' हे नाव हा एक शब्द असावा ('पराक्रम' अशा अर्थी), की यातीलही 'जी' हा आदरार्थी असावा, याबद्दल पुन्हा साशंक आहे. ती शक्यताही अगदीच नाकारता येत नाही.

असे पहा. 'शिवबा' मधील 'बा' घ्या. आणि 'सखारामबापू'मधील 'बापू' घ्या. हे 'बा' आणि 'बापू' हे दोन्ही प्रत्यय (श्लेष अनपेक्षित) साधारण सारखे-समानार्थी आहेत. पैकी 'बापू' हे स्वतंत्र संबोधनही होऊ शकते. (पहा: बापू गोखले.) तसेच 'बा' हेही होणे अगदीच अशक्य आहे काय? आणि मग पुढे या 'बा'ला आदरार्थी 'जी' का लागू नये? 'बापूजी' सारखे? (पहा: बापूजी अणे.)

फार कशाला, 'मुरारी' + 'बा' + 'जी' = 'मुरारबाजी' जर होऊ शकते, तर मग नुसत्या 'बा' + 'जी' = 'बाजी'नेच काय घोडे मारले आहे?

(शिवाय, 'मुरारबाजी'मध्ये दोनदोन आदरार्थी प्रत्यय नाहीत काय? कोण म्हणतो मराठ्यांत* आदरार्थी प्रत्ययांची माळ लावण्याची परंपरा नाही म्हणून?)

अर्थात, हा निव्वळ तर्क आहे. खात्रीलायक, अभ्याससिद्ध उत्तर माझ्याजवळ नाही.

अवांतर: 'दाजी'मधील 'दा' हे 'दादा'चे संक्षिप्त रूप नसू शकेल काय?
------------------------------------------------------------------------
* हा शब्द जातिवाचक अर्थाने न घेता प्रादेशिक अर्थाने घ्यावा.
==============================================