विजय,

मराठी भाषा विकसित होत असताना तिने संपर्क आलेल्या विविध भाषांतील प्रत्यय, संबोधने जिरवून घेतली. नावातील जी हे संबोधन कसे आले असावे, याबद्दल माझा विचार असा आहे, की ही नावे राजस्थानातील राजपूत जमाती महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्या त्याबरोबरच इकडे आली असावीत. राजस्थानात राजाला 'राणाजी' म्हणत आणि नावापुढे सिंह व त्याहेपुढे जी लावण्याची पद्धतही तिकडलीच (गुजराथमध्ये श्रीकृष्णालाही नाथजी, रणछोडदासजी असे संबोधतात. ) शिवाजी महाराजांचे कुळही राजपूत शिसोदिया होते. त्यांची पूर्ण वंशावळ प्रसिद्ध झाली आहे. त्यात बाबाजी भोसलेंपासून सर्वांच्या नावात जी होतेच (मालोजी, विठोजी, शहाजी, शरीफजी, शिवाजी, संभाजी. राजाराम नावात ही परंपरा खंडित झाली. शाहू महाराजांचे नावही शिवाजीच ठेवले होते, पण औरंगजेबाने ते बदलले. 'तुझा आजोबा चोर होता. तू साव व्हावेस अशी माझी इच्छा आहे. म्हणून तुझे नाव यापुढे साहुजी' असे तो म्हणत असे. पुढे याच साहुजीचे शाहू झाले. नावातील जी पुढे मराठीत रुळून गेले व नावे तशीच ठेवण्याची पद्धत पडली.

आधी यादवांच्या काळात किंवा त्यापूर्वी हे जी चे प्रस्थ फारसे नव्हते. त्या काळात संस्कृत व कानडीचा मोठा प्रभाव नवजात मराठीवर होता. त्यात राजाला राय म्हणत. (पुढे या रायचेच राव झाले असावे) विजयनगरचे राजे स्वतःच्या नावापुढे देव आणि राय अशा दोन्ही पदव्या लावत. (कृष्णदेवराय, रामदेवराय). मराठीतील पहिला म्हणवल्या जाणाऱ्या श्रवण बेळगोळच्या शिलालेखात उल्लेख आहे, की 'श्री गंगराये सुत्ताले करवियले' म्हणजे हा राजा गंगरायाचा मुलगा असून त्याने हा प्राकृतातला शिलालेख करवून घेतला. विजयनगरच्या सम्राटाने राज्यविस्तार करताना महाराष्ट्रातील अनेक नवी गावे वसवली. तेव्हा कर्नाटकातील ब्राह्मण व इतर जातींना इकडे वस्ती करण्यास उत्तेजन दिले. त्यामुळे कानडीतील अण्णा (मोठा भाऊ), अप्पा (धाकटा भाऊ), अक्का (धाकटी बहीण), अम्मा (आई) अशी नाते संबोधने मराठीत रुढ झाली.

प्राचीन काळात ब्राह्मण स्वतःला शर्मन म्हणवत (विष्णुशर्मा), तर क्षत्रिय नावापुढे वर्मन लावत (कृतवर्मा). वैश्यांना पाल हे संबोधन होते (धनपाल), तर शूद्रांना दास म्हणत. अर्वाचीन काळात ब्राह्मणांनीही ही दास पदवी स्वीकारली (तुलसीदास, रामदास वगैरे) ब्राह्मणांना पंत म्हणण्याची पद्धत कशी पडली, हे मला माहीत नाही. यादवांचा प्रधान हेमाद्री होता. त्याला हेमाडपंत म्हणत. त्याने रुढ केलेली मंदिर उभारणीची शैली हेमाडपंती म्हणून ओळखली गेली. पण एक गोष्ट स्पष्ट, की त्या काळात ब्राह्मणांना पंत आणि मराठ्यांना राव म्हणायची प्रथा रुढ होती. कालांतराने नावापुढे हे राव संबोधन राजाधिकारपद मिळालेल्या ब्राह्मणांनीही स्वीकारले (रघुनाथराव, विश्वासराव, माधवराव, नारायणराव) पण पंत हे संबोधन मराठ्यांत रुढ झाले नाही. नंतर यात जी हे आदरार्थी संबोधनही मिसळून गेले. एक मजेशीर उदाहरण बघ. शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्तो प्रभुणीकर होते. यातला अण्णा म्हणजे कानडी, त्याला जी लागला आणि त्यालाही पुढे पंत जोडले गेले आणि त्यांचे नाव अण्णाजीपंत झाले. लोकांनी ते अनाजी दत्तो केले. पेशवाईत नारो अप्पाजी तुळशीबागवाले होऊन गेले. शहाजीराजांच्या सल्लागार मंडळात काकाजीपंत म्हणून मुत्सद्दी होते.

यावरून एक दिसते, की ही सर्वच आदरार्थी संबोधने होती आणि त्यांचे पुन्हा मिश्रण करण्यासही लोकांना काही वावगे वाटत नसे. फक्त एकच खेदजनक गोष्ट होती, की आदराची ही संबोधने काही सवर्ण जाती वगळता तळागाळातील लोकांच्या वाट्याला कधीच आली नाहीत. त्यांचा उल्लेख कायम एकेरी उदा : 'शिवा रामोशी', 'दगडू मांग', भिव्या बेरड असा होई. तेव्हाच्या गावगाड्यात एवढा बारीक विचार कुणी करत नसे.

असो. एकदा थांबतो म्हटल्यावर परत परत बोलत बसणे योग्य नव्हे. शेवटी इथल्या विद्वानांच्या मांदियाळीत मी सुद्धा फारसा अभ्यास नसलेला, अर्धवट गृहपाठ केलेला, नाटकी आदर दाखवणारा ठरलो आहे.