पहिले पेशवे : बाळाजी विश्वनाथ भट. विश्वनाथ हे अर्थात वडिलांचे नाव. हे विश्वनाथ भट, सिद्दी जोहरच्या सेवेत होते. सिद्दीची अवकृपा झाली म्हणून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली गेली. नंतर त्यांच्या बायकोला आणि मुलांना गुलामांच्या बाजारात विक्रीसाठी उभे केले असताना, रस्त्याने जाणाऱ्या मेव्हण्यांनी पाहिले. लिलावात बोली लावून त्यांनी आपल्या बहिणीला आणि भाच्यांना विकत घेतले. न बोलता मागे चालायला सांगून घरी नेले आणि आसरा दिला. लहानग्या बाळाजीने शिवाजीला पत्र लिहून नोकरीची याचना केली. शिवाजीला त्याचे वळणदार अक्षर आणि लेखन आवडले. पुढे रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना शिवाजीने बाळाजीच्या मामाचे घर शोधायला सांगून बाळाजीला बोलावून घेतले आणि आपल्या पदरी चिटणीस म्हणून ठेवून घेतले.
दुसरे पेशवे : बाजीराव बाळाजी भट, ऊर्फ राऊ, ऊर्फ बाजी, ऊर्फ रावबाजी. बाजीरावातले राव हे आदरार्थी इतर राव, बा, जी ह्यांतले कुठलेच आदरार्थी नसावेत. शहाजीचे आणि पर्यायाने शिवाजीचे शत्रू बाजी घोरपडे, हे ज्याअर्थी नुसतेच बाजी त्याअर्थी, बाजी हेच पूर्ण नाव असले पाहिजे.
तिसरे पेशवे : बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब. यांतले साहेब हेच तेवढे आदरार्थी उपपद. नाना टोपणनाव.
तान्हाजी हा काही फार मोठा साहेब नव्हता. तरी त्याच्या नावात जी आहे, त्यावरून असे दिसते की पाळण्यात ठेवलेले नावच जीकारान्त असावे.
स्वातंत्र्य चळवळीतले अग्रणी बाळ गंगाधर टिळक, अर्थतज्ज्ञ लेखक बाळ गाडगीळ, लेखक बाळ सामंत, नाटककार बाळ कोल्हटकर, आकाशवाणी निवेदक बाळ कुडतरकर, विचावंत लेखक-लेखिका प्रकाश बाळ आणि विद्या बाळ, दूरचित्रवाणीवरच्या चिमणरावांचे मावसभाऊ बाळ कर्वे, बाळ भागवत(आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरचे एक गायक), बाळशास्त्री हरदास(एक विद्वान शास्त्री आणि वक्ते), दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर(मराठीतल्या पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक संपादक) आणि शिवसेनासंस्थापक बाळ ठाकरे ही महाराष्ट्रातली मोठी बाळ माणसे. यांतल्या कुणालाही आपल्या 'बाळा'आधी किंवा नंतर बिरुदांचे शेपूट लावायले लागले नाही, तरीसुद्धा या सर्व लोकांबद्दल आपल्याला वाटणाऱ्या आदरभावात कधीही न्यूनपणा आला नाही.
तर मग, हे आत्ताच मा. जी. चे प्रस्थ का वाढावे? काँग्रेस संस्कृती म्हणतात म्हणतात ती हीच का?