पण मी उद्धृत केलेल्या रचनांना हे गुण आहेतच, शिवाय इतर विशेष गुण आहेत ...

तुम्ही उद्धृत केलेल्या उदाहरणांत आठ आठ अक्षरे आलेली आहेत. असे असले तरी ही एखाद्या नियमाची पूर्ती केल्यामुळे झालेले आहे असा त्याचा अर्थ नव्हे. कारण ह्या उदाहरणांतील त्या त्या वृत्तांसाठी आठ आठ अक्षरे यावीत असा 'नियम' नाही तर तसा तसा लघुगुरू क्रम यावा असा नियम आहे. (म्हणजे आठ ऐवजी नऊ अक्षरे येऊनही ते नियम पाळले गेलेले असणे शक्य आहे. )
(कृत्रिम) उदा. तुम्ही दिलेल्या उदाहरणांत समजा

आपापल्या तंबूमधे जो तो दडाया लागला
ऐवजी
आपापल्या घरट्यामधे जो तो दडाया लागला
असे असते तरी ते वृत्त सांभाळले गेले असतेच. पण येथे आठ ऐवजी नऊ अक्षरे झाली.

किंवा
तसे कित्येकदा मीही मला न्यायालयी नेले
ऐवजी
तसे कित्येकदा मीपण मला न्यायालयी नेले
असे असते तरी ते वृत्त सांभाळले गेले असतेच. पण येथेही आठच्या जागी नऊ अक्षरे आली.

अष्टाक्षरीत असे चालले नसते. तेथे आठच अक्षरे असावी लागतात. तेथे वरीलप्रमाणे नऊ झाली तर ती लयीत म्हणता येणार नाही. (कारण सर्व आठ अक्षरे गुरु असल्याप्रमाणे म्हणायची असतात. तेथे नववे अक्षर अडचणीचे होईल. )

थोडक्यात : आठ अक्षरे हा अष्टाक्षरीचा नियम आहे. इतरत्र आठ अक्षरे दिसत असली तरी ती नियम पाळला गेल्याचे फलित म्हणून नाही.
किंवा
आठ अक्षरे नसल्यास कधीच चालणार नाही ती अष्टाक्षरी असा काहीसा नियम सांगावा लागेल असे वाटते.

(कानावर हात : आधी इतरत्र म्हटल्याप्रमाणे मी प्रतिभावान कवी नाही; शिवाय संदर्भासाठी कुठलेही पुस्तक माझ्या हाताशी नाही. केवळ हौशीने इकडून तिकडून ही माहिती मिळवलेली आहे. तेव्हा चू. भू. द्या. घ्या.)