ही तीनही अक्षरवृत्ते म्हणजे छंद असावेत. म्हणजे ओळीचे गण न पाडता किंवा मात्रा न मोजता फ़क्त अक्षरांचे बंधन पाळायचे.
ओवी आणि अभंग ह्यांचे सामान्य स्वरूप एकच आहे.   चार ओळी असलेल्या बहुतेक ओव्या व अभंग यांतल्या पहिल्या तीन ओळीत ६ किंवा ८ अक्षरे, आणि चौथ्या ओळीत बहुधा ४.  ओवीरचना प्रायः सामान्य स्त्रियांची असल्याने अक्षरांचे हे बंधन झुगारून दिले तरी चालते. उच्‍चार करताना अक्षराची लांबी कमी जास्त करून चालीवर म्हणता आल्याशी कारण. अभंगामध्ये ओवीइतके  स्वातंत्र्य (बहुधा) घेतले जात नाही.    ओवी आणि अभंग या दोघांच्या चाली वेगळ्या आणि  विषयही.   यमकाचे नियम दोघांचे ज़वळपास सारखे.  अर्थाच्या दृष्टीने प्रत्येक ओवी स्वतंत्र असते, तर एकाच विषयावरील पाचसहा अभंगांचा एक गट असतो. अशाच प्रकारे, चार ओव्यांचा गट म्हणजे एक घनाक्षरी.
उदाहरणे :
ओवी : यज्ञासाठी भूमी । नांगरीतां धन्या । सांपडली कन्या । सीतादेवी ।।  -- मोरोपंत
फूल फूल घोसाळिये । फूल गेलें गं घोसांत । तुझें सासर देशांत । अंबूबाई ॥  --एक स्त्रीगीत
अभंग :  नाही संतपण । मिळत तें हाटीं  । हिंडतां कपाटीं । रानीं वनीं ॥  -कृष्णकेशव
भूपाळी : उठी गोपालजी । जाय धेनूकडे । पाहती सौंगडे । वाट तूझी ॥  - कृष्णकेशव
अष्टाक्षरी : रूप पाहतां लोचनीं । सुख झालें वो साजणी । सर्व सुखाचें आगरू । बाप रखुमादेवी-वरू ॥ -- ज्ञानेश्वर

या सर्व प्रकारांत फक्त अक्षरसंख्येचे बंधन  पाळलेले दिसते आहे, लघुगुरूंचे नाही.