१) माणसाला वाटतं की त्याला सगळं माहिती आहे पण ते आचरणात येत नाही कारण तो त्याचा अनुभव नसतो, ती त्याची माहिती असते. कोणत्याही अध्यात्मिक चर्चेत प्रत्येकजण आपलं मत व्यक्त करू शकतो पण ते त्याचं वाचन किंवा श्रवण असतं त्यानी त्याचा प्रयोग केलेला नसतो. ओशोंचं एक सुरेख वाक्य आहे : 'समझ आचरणमें बदल जाती है'.

जीवन स्वप्न आहे हे आपण प्रत्येकानी वाचलं आहे पण दिवस उगवला की आपण ज्या तऱ्हेनी कामाला लागतो तिथेच जीवन वास्तव झालेलं असतं आणि माहिती विस्मृतीत गेलेली असते.

२) जीवनाची मजा सत्य कळलं तरच आहे कारण मग सगळा मूडच लाईट होतो. कृष्णमूर्ती म्हणतात तुमच्यात आणि माझ्यात फक्त एक फरक आहे 'प्रसंग माझ्यावर परिणाम करत नाही'.

प्रसंग तोच आहे, जीवन तेच आहे पण आपल्याकडे माहिती आहे त्यांच्याकडे अनुभव आहे.

३) आपल्याला अनुभव न येण्याची दोन कारणं आहेत.

एक, मानवी मूल हे व्यक्ती म्हणून घडणं अपरिहार्य असतं आणि एकदा हे व्यक्तीमत्व घडल्यावर आपण मरेपर्यंत स्वतःला व्यक्ती समजतो आणि आपली ही समजूत आपलं कुटुंब आणि समाज क्षणोक्षणी दृढ करत जातो. त्यामुळे आपल्याला आपण अमर आहोत वगैरे ही नुसती माहिती असते. अशा परिस्थितीत आचरणात फरक कसा पडणार? व्यक्तीमत्वाचा ताण रात्रंदिवस बेजार करतो आणि माहिती स्मृतीत राहते.

दोन, एखादा अनुभव असलेला जर आपल्याला काही सांगू लागला तर आपण एकतर त्यालाच कसे समजले नाही हे सिद्ध करण्यात वेळ घालवतो किंवा जरी तो सत्य (किंवा निराकारा) विषयी सांगत असला तरी त्याच्या व्यक्तिमत्वाचा उहापोह करतो आणि चर्चा निराकारा विषयी न होता परत व्यक्तिमत्वावर येते.

याहून ही मजा म्हणजे असा माणूस गेल्यावर त्याच्या जीवनात घडलेले प्रसंग वर्णन केले जातात, त्याचे अनेकविध अर्थ काढले जातात, त्यातून धर्म आणि पंथ तयार होतात, धर्मातल्या वैविध्यामुळे माणसे विभागली जातात, त्यातून सामाजिक आणि राजकिय कलह होतात आणि सर्वात मजा म्हणजे या निमित्तानी सर्वांचं व्यक्तिमत्व पुन्हा मजबूत होतं.

४) आपण व्यक्ती नसून निराकार जाणिव आहोत हा आपला अनुभव होणं ही आचरण आणि समज यातली दरी पूर्णपणे नाहीशी करण्याचा मार्ग आहे आणि त्यालाच अध्यात्म म्हटलं आहे

५) तुम्ही जर अध्यात्मिक स्वरुपाची कथा लिहीणार असाल तर मला आनंद आहे पण त्यात स्वतःला व्यक्ती समजणं (ज्याला अध्यात्मात इगो किंवा अहंकार असं भव्य नांव आहे) कसं गोंधळाचं ठरतं हा अनुरोध ठेवलात तर ते सगळ्यांना उपयोगी होईल. वेळ मिळाला की मी स्वतः यावर एक विनोदी कथा लिहीणार आहे, तुम्ही लिहू शकलात तर फारच छान कारण तुमच्याकडे ही शैली आहे. तुम्हाला शुभेच्छा.

संजय