सर्वच बा आदरार्थी आणि कुत्सितार्थी नसतात.  काही, ना इकडचे ना तिकडचे असे न्यूट्रल असावेत.  धोंडिबा, कोंडिबा, बजाबा, महादबा हे त्यांतले काही.  बायांमध्येदेखील काही प्रथमदर्शनी जुन्या पद्धतीच्या वाटणाऱ्या  काकूबाई आणि काही मोठ्ठे कुंकू लावणाऱ्या अंबाबाई असतातच ना?

यावरून एक आठवले.  शाळेतल्या एक काळ्यासावळ्या शिक्षिका काही निरोप सांगायला आमच्या दारापर्यंत आल्या. या-बसा म्हटले तरी वेळ नसल्याने थांबू शकत नव्हत्या. त्या बाई सुती साडीत होत्या आणि एकूण प्रसन्‍न व्यक्तिमत्त्वाच्या होत्या.  आम्ही त्यांच्याशी  आदबीने बोलत होतो,  हे आमच्याकडे आलेल्या एका पंजाबी बाईने पाहिले. "तुम्ही मोलकरणींशी इतक्या नम्रतेने बोलता?", तिचा प्रश्न.   "भलतेच काय? त्या मोलकरीण नाहीत, शाळेतल्या शिक्षिका आहेत", आमचे उत्तर.  "मग तुम्ही त्यांना बाई का म्हणत होतात? मला माहिती आहे की, महाराष्ट्रात कामवाल्या बायांना  बाई म्हणतात. "

आता घ्या!  आम्ही मोलकरणींनाही आदराने वागवतो, म्हणूनच त्यांना बाई म्हणतो, हे त्या पंजाबिणीला कसे पटावे? उत्तरी भारतात बोलण्यात हांजीहांजी असेल, पण नोकरांशी बोलताना त्यांच्याइतकी तुच्छ आणि अपमानास्पद वागणूक त्यांना कुणी देत नसेल.