'फळाची अपेक्षा न करता तू तुझे काम (कर्तव्य) करतच राहा' या वाक्यातून पुढे उमटणाऱ्या भावछटांच्या अनुरोधाने मी माझी शंका उपस्थित केली आहे. मला हा श्लोक संभ्रमात पाडतो म्हणूनच मी त्यातून समन्वयी अर्थाची अपेक्षा बाळगतो.
मला या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, की कार्य करताना फळाची अपेक्षा का नाही बाळगायची? मतदानाचे उदाहरण मी एवढ्यासाठी दिले, की मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे, हे मान्य आहे, पण आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून कल्याणकारी कारभाराची अपेक्षा उरतेच. ती कशी नष्ट होणार? मग जर कुणी परिणामांची अपेक्षा न करता तुम्ही तुमचे कर्तव्य करत राहा, असे सांगू लागले तर असे कर्तव्य आंधळेपणाने का करायचे, अपेक्षा पूर्ण होत नसेल तर बदल का घडवायचा नाही? असा माझा प्रश्न आहे. आपण दुसऱ्या प्रकारचे उदाहरण घेऊ. मुलांचे संगोपन करणे (यात शिक्षण आलेच) हे पालकांचे कर्तव्य आहे. आता जर मुलगा शिक्षणात प्रगती दाखवत नसेल उलट असे सांगत असेल की माझ्याकडून तुम्ही फळाची अपेक्षा बाळगू नका तुम्ही केवळ तुमचे कर्तव्य करत राहा तर पुन्हा वरचाच प्रश्न निर्माण होणार.
मिळवलेल्या संपत्तीतून समाजाच्या हितासाठी दान द्यावे, हे कर्तव्य आहे. पुन्हा अशा मदतीबद्दल परतफेडीची अपेक्षा बाळगू नये, असेही म्हटले जाते. रास्त आहे, पण त्या लाभार्थीने पुढे अन्य गरजूलाही मदत करावी, ही अपेक्षा उरतेच की (म्हणूनच विंदासुद्धा 'देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे' एवढे कर्तव्य सांगून थांबत नाहीत तर पुढे 'घेता घेता एक दिवस देणाराचे हात घ्यावे' अशी अपेक्षा/सल्ला व्यक्त करतात.)
मी अर्थ समजून घेण्यात कमी पडत असेन तर ती माझी मर्यादा असू शकेल, पण माझ्या वैयक्तिक परिप्रेक्ष्यात अनुभवलेल्या गोष्टींवरून जाणवले ते मांडले. या धाग्याचे लेखक संजयजी क्षीरसागर यांनी काही काळापूर्वी उद्योजकतेवरही काही विचार मांडले होते. जे एक उद्योजक/व्यावसायिक या नात्याने मला अत्यंत भावले होते. आता मी त्यांना नम्रतेने विचारू इच्छितो, की उद्योजकतेत जिथे रिस्क (जोखीम) आणि रिटर्न (परतावा) हेच अस्तित्वाचे मूलाधार असतात तेथे हा कर्मसिद्धांत मान्य करावा का? शेतकरी हाही एक उद्योजक असतो. त्याला त्या व्यवसायाचे फळ मिळणार नसेल, कष्टाची किंमत किंवा परतावा मिळणार नसेल तर त्याने 'काळ्या आईची सेवा' या भावनिक श्रद्धेपोटी शेती किती काळ 'कर्म' (कर्तव्य) म्हणून करत राहावी?