आजानुकर्ण यांचे म्हणणे पटण्यासारखेच आहे, पण मग लगेच पुढचा प्रश्न मनात येतो, की ही आत्मसंतुष्टी नसून वेदनाशमन असेल तर समाजाला या औषधाची चटक तर नाही ना लागली? म्हणजे प्रारंभी पोटातील असह्य कळा शमवण्यासाठी कणभर अफू सेवन करावी आणि नंतर मग मनाला सुख वाटते म्हणून ती रोजची सवय व्हावी, असे झाले असावे का?
हा संपूर्ण अभंग वाचल्यावर प्रत्येक ओळीला ' का? कशासाठी? ' असा प्रश्न मनात येतो. देव म्हणजे नक्की कोण? त्याची एकच एक आणि स्पष्ट व्याख्या का नाही? शेंदूर फासलेले दगड म्हणजे देवच. रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये आहेत, पण त्यांचे नायकही देवच. कुणी म्हणते की 'काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल' (म्हणजे प्रत्येकाचा आत्मा हा देवच. ) सगळ्यात शेवटी 'देव म्हणजे अशी एक चैतन्यशक्ती (ब्रह्म) जी अनादी, अनंत, अव्यक्त, अविनाशी, निर्गुण आहे' या व्याख्येशी सगळे येऊन थांबतात. हा देव निर्गुण, निराकार, अनासक्त असेल तर त्याला विशिष्ट आवड, भावभावना कशा असू शकतील? मग त्या स्थितीत त्याच्यावर भार घालायचा म्हणजे नक्की काय करायचे?
मला तरी वाटते, की समाजाचे 'कुंभाराचे गाढव' होत असावे. कुंभार पहिले दोन-तीन दिवस गाढवाच्या पायाला दोरी करकचून बांधतो. नंतरचे दोन दिवस दोरी गाढवाच्या पायाला नुसती घासतो. गाढवाला वाटते, की दोरी बांधली आहे. ते जागचे हलत नाही. पुढे पुढे तर कुंभाराला दोरी घासायचेही काम करावे लागत नाही. गाढवाला खांबाजवळ उभे केले की ते सवयीनेच त्या अवस्थेत नेहमी राहते.
निष्क्रियतावादी तत्त्वांचे हेच आहे. एकदा ती दोरी समाजमनाला घासली, की नंतर सवय पडून जाते.