ही मालिका स्मरणाआड गेलेल्या कवींबद्दल आहे. कवी दत्त ज्ञात असूनही स्मरणाआड गेलेले असणे शक्य आहे, असे वाटते.
- होय. तुमच्याशी सहमत :)
एखादा कवी, एखादा कलाकार केवळ आपल्याला माहीत असतो, म्हणून तो सगळ्यांनाच माहीत असेल, असे नाही. प्रत्येकाचे आवडीचे, अभ्यासाचे विषय वेगवेगळे असतात. आता, या मालिकेतील सगळेच कवी मला आधी वाचून-ऐकून माहीत होते. मग प्रश्न तिथेच मिटला असता! मला माहीत आहेत, मग ते सगळ्यांनाच माहीत असावेत, असा विचार मी केला असता तर मग ही मालिका जन्मण्याचे काही कारणच नव्हते!! पण तसे नसते.
आणि एखादी गोष्ट आपल्याला माहीत आहे म्हणजे काही आपलेही हात आभाळाला टेकलेले असतात, असे नव्हे. तो आपल्या आवडीचा विषय असतो आणि त्यात आपण इतरांपेक्षा अधिक लक्ष घालतो आणि मग त्यांच्याविषयीची अंमळ जास्त माहिती आपल्याला असते, इतकेच. (आता शास्त्रज्ञांबद्दल मला विचाराल तर आईनस्टाईन / आईनस्टीन, न्यूटन, ग्रॅहम बेल, एडिसन यांच्यापुढे माझी झेप जाणार नाही. )
या मालिकेतील कवी साठी-सत्तरी-ऐंशीच्या उंबरठ्यावरील साहित्यप्रेमी वाचकांना माहीत असल्यास त्यात नवल ते काहीच नाही. पण माझ्यापेक्षा एका पिढीने मोठ्या असलेल्या म्हणजेच पन्नाशीतील काही साहित्यप्रेमी लोकांना यातील अनेक कवींसंदर्भात मी विचारले असता या कवींची नावेही त्यांना ठाऊक नव्हती. (आणि हे लोक साहित्यप्रेमी, काव्यप्रेमी होते, हे विशेष). जिथे पन्नाशीच्या पिढीलाच हे कवी माहीत नाहीत तिथे मग चाळीशी, तिशी, विशीतील साहित्यप्रेमींना काहीच माहीत असण्याची शक्यता नव्हती. म्हणून मग लिहायचे ठरविले.
तेव्हा तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे. दत्त हे जुन्या पिढीला ज्ञात असलेले; पण आजच्या पिढीच्या स्मरणाआड गेलेलेच कवी आहेत. म्हणूनच त्यांच्यावर लिहावे, असे वाटले.