सौरभ यांच्या प्रतिक्रियेच्या अनुषंगाने..

असे वाटते, की एक तर गीता समाजाला नीट समजली नसावी किंवा ती सुस्पष्टपणे समजाऊन देण्यात विद्वान कमी पडले असावेत. एखादी गोष्ट वास्तव, वैश्विक सत्य, मूलाधार म्हणून मान्य करायची असेल तर त्याची शब्दरचना अथवा प्रतित होणारा अर्थ हा तितकाच सुस्पष्ट असावा लागतो.

'जैसा कर्म करेगा वैसे फल देगा भगवान, ये है गीता का ग्यान' हे हिंदीतील किंवा 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर' हे मराठीतील गाणे ऐकल्यानंतर निदान एवढे तरी समजते, की कर्म आणि फळ यांचा काही तरी संबंध आहे. वर्तमानात केवळ कर्म करायचे आणि फळ कुठे पिक्चरमध्ये येत नाही, हे मान्य केले तर मग वरच्या प्रतिपादनाला काय अर्थ राहतो? कारण तेथे कर्माची संगती फळाशी स्पष्ट लावली आहे. हे फळ वर्तमानकाळात नव्हे तर भविष्यात पिक्चरमध्ये येते. एका अर्थी ते अँटीसिपेटरी (अपेक्षात्मक) आणि पुन्हा कंडिशनल आहे. म्हणजे 'जर तुम्ही असे केलेत तर तुम्हाला तसे मिळेल' वगैरे. मग जी गोष्ट प्रमेयात गृहित धरली आहे ती पिक्चरमध्ये येतच नाही, असे कसे म्हणता येईल?

काळ माणसांनी निर्माण केलेल आहेत यापेक्षा अचूक विधान म्हणजे 'काळ हा पूर्वीपासून असीम, अनंत आहे. माणसांनी स्वतःच्या संदर्भ चौकटीत त्याचे तीन टप्पे पाडले आहेत.' पुन्हा ते टप्पेही परस्परांत गुंतले आहेत. भूतकाळाच्या पायावर वर्तमान उभे आहे आणि वर्तमानाच्या खांद्यावर भविष्य बसले आहे. यातील भूतकाळ आपल्या हातात नाही, पण उरलेले दोन्ही काळ आपल्या हातात आहेत. वर्तमानाप्रमाणेच भविष्यही आपल्याच हातात आहे. तसे नसेल तर 'तूच आहेस तुझ्या भविष्याचा शिल्पकार' हे वाक्य मानता येणार नाही.

आता सौरभ आपल्या प्रतिक्रियेत तिसरा मुद्दा मांडतात तो बघू.

>>शास्त्रिय दृष्या - मुळात कर्म/काम कसं घडतं हे क्लिअर होणं आवश्यक आहे. आधी संवेदना, संवेदनांमुळे भावना, भावनांमुळे विचार, विचार प्रबळ झाले की इच्छा आणि इच्छेमुळे कर्म. हा अल्गोरिदम फिक्स्ड आहे. इच्छा म्हणजेच खरं म्हणजे प्रार्थना. आपली प्रत्येक इच्छा ही प्रार्थना असते आणि ती देवापर्यंत पोचत असते. त्यामुळे कर्म फलिभूत होतात. आता राहिला प्रश्न त्या कर्माच्या फळाचा. एखादं काम केल्यानंतर तुम्ही जर फळाविषयी इच्छा प्रकट केली तर ती देवापर्यंत पोचतच नाही कारण तसा अल्गोरिदमच नाहिये! ते विचार निरुपयोगी (युसलेस) ठरतात. म्हणूनच कृष्णाने गीतेमध्ये फॅक्ट सांगीतली आहे.<<

यातील पहिल्या दोन ओळीत सांगितलेला अल्गोरिदम ठीक आहे, पण इच्छा म्हणजे प्रार्थना आणि ती देवापर्यंत पोचते व त्यामुळे कर्म फलिभूत होतात याला शास्त्रीय आधार काय? मुळात देव म्हणजे नक्की कोण? शेंदूर लावलेला दगड म्हणजे देवच. रामायण व महाभारत या महाकाव्यांचे नायक असलेले राम व कृष्ण हे मानव पण देवच, 'काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल' मध्ये म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाचा आत्मा हा देवच आणि 'देव म्हणजे अशी चैतन्यशक्ती (ब्रह्म) जी निर्गुण, निराकार, अनादि, अनंत, अनासक्त आहे' ही तर आकलनाची अंतिम पायरी. आता जर हा देव गुणरहित व अनासक्त असेल तर आपली अपेक्षा आणि त्याची आवड याला अर्थच कुठे उरतो?

तुम्ही म्हणता, की आपली प्रत्येक इच्छा प्रार्थना असते आणि ती देवापर्यंत पोचत असते. मग काम केल्यानंतरची फळाविषयीची इच्छा त्याच्यापर्यंत का पोचत नाही? ही सिलेक्टिव्हिटी विचित्र आहे आणि दुसरे विधान पहिल्याला खोटे पाडते आहे. सर्व इच्छा देवापर्यंत पोचत असतील तर कर्मानंतरची फळाबाबतची इच्छाही पोचायलाच हवी. पूजा या कर्मात देवतेला आवाहन, प्रतिष्ठापना, मंत्रोपचार, नैवेद्य, आरती, क्षमापना आणि सर्वात शेवटी शांतिमंत्र असतो. फलश्रुती ही स्तोत्रात नेहमीच नंतर येते आणि तिथेही 'आम्ही आमचे कर्म केले आहे. आता तू त्याचे फळ आम्हाला दे' अशीच प्रार्थना असते. ती देवापर्यंत पोचत नाही का? बरं समजा कर्म झाले आहे, त्याचे फळही मिळाले आहे तर त्यानंतर आभारप्रदर्शक आणि पुढील सुखासाठी केलेल्या प्रार्थनेचे काय?