सगळं अस्तित्व ही न थांबणारी सलग प्रक्रिया आहे त्यामुळे फल ही संकल्पना वैयक्तीक दृष्टीकोनातून निर्माण होते. तुम्ही अत्यंत खोलात जाऊन बघीतलं तर तुमची प्रत्येक क्रिया ही अस्तित्वाच्या सुरुवातीशी जाऊन मिळते!

त्याचं असं आहे, समजा मी गाणं शिकायचं ठरवलं, मी समग्रतेनी गाणं शिकलो आणि मी प्रख्यात गायक झालो असं आपल्याला सकृद्दर्शनी वाटतं पण त्या मागे किती तरी भानगडी असतात. पहिली म्हणजे माझा जन्मच कसा झाला? मग एवढ्या प्रचंड लोकांत माझ्याच आई वडीलांनी एकमेकांना का निवडलं? मग त्यांच्या जन्माचं काय? असं करत तुम्ही कोणतीही प्रक्रिया पार जगाच्या सुरुवातीला भिडवू शकता. बरं एवढं होऊन परत मूळ प्रश्नाला सुरुवात होऊ शकतेः माझ्या मनात गाणं शिकायचाच विचार कां आला? क्रिकेट शिकायचा कां नाही आला? त्यामुळे जरी प्रयत्नाचा फलाशी संबंध दिसला तरी तो फार वरवरचा भाग असतो. 

मला फक्त एवढच म्हणायचंय की तुम्ही कामाशी असंग आहात हे लक्षात आलं की तुम्ही कोणतंही काम मजेनी करू शकता, साध्या चालण्याची तुम्हाला मजा यायला लागते. तुम्ही श्लोकाचा अर्थ काढण्या एवजी कामात मग्न होता!

संजय