धर्म व्यष्टी (आंतरिक शांती आणि बाह्य समृद्धी यातील ताळमेळ साधू शकेल अशी व्यक्ती) आणि समष्टी (समाज, राष्ट्र, विश्व अशा व्यक्तींच्या समूहाच्या उन्नत आणि विधायक असायला हव्यात अशा अवस्था) दोन्हीच्या हिताचा विचार करतो. मुळात या दोन्हीच्या हितात निसर्गतः विरोधच नसतो.
व्यक्तीच्या स्वातंत्र्याची गळचेपी करून, 'पिण्डे पिण्डे मतिर्भिन्न:' या निसर्गनियमाची पायमल्ली करून धाकाने त्याला बैलासारखे घाण्याला जुंपून तथाकथित समाजहित साधणार्या काही विचारधारा आहेत. अशाने काही काळ वरपांगी त्या समूहाची प्रगती झाल्यासारखे वाटले, तरी या गळचेपीविरुद्ध जो विद्रोह होतो त्यात ही प्रगती झाकोळून जाते आणि समाजाचा फार मोठा अध:पात होतो.
या उलट सामाजिक, नैतिक बंधने पूर्णपणे झुगारून देऊन व्यक्तीस्व्यातंत्र्याचा पाचकळ नखरा, सुधारणेच्या नटव्या कल्पना याना कवटाळणार्या काही विचारधारा आहेत. व्यक्तीच्या सृजनशीलतेला, जोखीम घेण्याच्या क्षमतेला अशाने पाठबळ मिळते असे पोकळ दावे ही मंडळी करतात. समाजाच्या निकोप धारणेलाच तडा देणारे हे विचारही खोल गर्तेत घेऊन जातात.
हे दोन्ही विचार भारताचे नव्हेत! आमचा न्यूनगंड आपले सत्त्व, स्वत्व गमावल्याने आला आहे.
धर्म आणि राजकारण यांचे म्हणाल तर धर्माचे अधिष्ठान असणारे राजकारण करणार्या जाणत्या राज्याचे लोककल्याणकारी राज्य, रामराज्य महाराष्ट्राने, भारताने अनुभवलेले आहे. दुर्दैवाने राजसत्तेच्या हातातील बटीक असणारी दुबळी, असहाय, लाचार, परजीवी तथाकथित धर्मसत्ता आज अनुभवास येते. धर्मसत्ता आणि राजसत्ता सरसकट खलनायक ठराव्यात असा काही नियम नाही. जगात शांतता कशी नांदेल हे आपल्यासारख्या सामान्यांच्या तसे आवाक्याबाहेरच आहे. आपल्या सगळ्या मर्यादा लक्षात घेउनही किमान आपली 'सत्कर्मी रती वाढावी' यासाठी आपण काही प्रामणिक प्रयत्न करतो का याचे उत्तर ज्याने त्याने स्वत:शी प्रामाणिक राहून शोधले, तरी थेंबे थेंबे तळे साठून माउलींचे पसायदान वास्तवात उतरण्याची शक्यता तरी वाढेल असे वाटते.
(संपादित : प्रशासक)