मानवनिर्मित संकल्पना आहे. निसर्गांतील जें कोडें आज उलगडलेंलें नाहीं वा ज्या घटनांचा उलगडा आजच्या विज्ञानावर तर्कसंगतीनें होत नाहीं त्यामागें देव आहे असें म्हटलें जातें. देव ही अशी काल्पनिक अदृश्य शक्ती आहे जिचें अस्तित्त्व मानल्यामुळें निसर्गांतील न उलगडलेलीं कोडीं व तर्कसंगत नसलेल्या घटनांचा उलगडा होतो. देव मानवाला कठीण प्रसंगीं व संकटसमयीं मुक्त करणारा काल्पनिक तारणहार आहे. परंतु अडचणीच्या वा संकटाच्या प्रसंगी देवाचें अस्तित्त्व न मानतां संकटाला वा परिस्थितीला तोंड देण्याइतपत धैर्य फारच थोड्यांच्या अंगीं असतें. बुडणारा माणूस हातपाय हलवतो तशी संकटसमयीं देवाचें असित्त्व शोधणें ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. लोकसमूहाचें बळ मिळवण्यासाठीं देव वा तत्सम काल्पनिक शक्तीचा उपयोग कांहीं चतुर व्यक्तीं स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठीं करून घेतात. कुणाला संपत्ती, कुणाला सत्ता तर कुणाला केवळ फुकटचा मोठेपणा याची लालसा असते. यातूनच, धर्म, पंथ, संप्रदाय वगैरेंचा उगम झाला  तसेंच तथाकथित प्रेषित, धर्मगुरू, साधू, बाबा इ. चा फायदा झाला. गाडगेबाबांसारखे खरे संत जवळजवळ नाहींतच.

व्यक्तिगत नियती वा दैव असें कांहींही नाहीं. हे सगळे अपयशी, संकटग्रस्त वा गोंधळलेल्या मानवाच्या कल्पनाशक्तीचे तर्कदुष्ट खेळ आहेत.

बुद्धीऐवजीं भावनेच्या आधारावर काल्पनिक शक्तीवर ठेवलेला विश्वास म्हणजेच श्रद्धा वा अंधश्रद्धा. श्रद्धा वा अंधश्रद्धा दोन्हीं एकच. ती कधींही डोळस नसते.  स्वतःची श्रद्धा ती डोळस व इतरांची ती अंधश्रद्धा असें म्हणण्याची रीत आहे. चिकित्सेला मज्जाव करून काल्पनिक गोष्टीवर ठेवलेला विश्वास यालाहि श्रद्धा म्हणतां येईल. श्रद्धावान व्यक्ती ही सच्छील असते असाही एक समज आहे. म्हणून लबाड व्यक्ती आपण सश्रद्ध, धार्मिक आहोंत असें दाखवतात. सश्रद्ध असणें ही एक सज्जनपणाची खून आहे असेंही समजलें जातें. अशा अनेक कारणामुळें माणसें सश्रद्ध बनतात व श्रद्धेचें समर्थन करतात.

सुधीर कांदळकर