देव म्हणजे स्वतःपेक्षा ह्या जगात काही विराट, अद्भुत, अनाकलनीय जे जे काही आहे ते ते! आणि स्वतःतील विराट अवकाशही त्याच देवत्वाचा अंश! देवत्व हे मानण्यात आहे. प्रत्येक गोष्टीची शास्त्रीय/ वैज्ञानिक दृष्टीकोनातून चिरफाड केली तरी त्यातून भावनेला पुष्टी व तुष्टी मिळत नाही. ती समाधान व परिपूर्तीची भावना देव मानण्यामागे असू शकते.
तसे बघायला गेले तर आई म्हणजे आपल्याला जन्म देणारी मानवी मादी. म्हणजे, केवळ शास्त्रीय/ वैज्ञानिक दृष्टीने बघायला गेले तर!
पण त्यातच भावनेची गुंफण झाली की त्या मातृत्वाला वेगळाच आयाम प्राप्त होतो. ते उदात्त होऊ शकते. त्याला अजून गहिरेपण येऊ शकते. मानवी मनाची ही भूक श्रद्धा, ईश्वरी संकल्पना पुरी करतात. त्याला जंगली श्वापदापेक्षा अधिक चांगल्या/ वेगळ्या तऱ्हेने वागण्यास प्रवृत्त करतात. माणूसपणावर आणि माणसातल्या देवत्वावर (चांगुलपणावर) श्रद्धा ठेवण्यास पोषक वातावरण निर्माण करतात.
देव म्हणजे प्रेमाचे पराकोटीचे स्वरूप, जिथे ठायी ठायी चैतन्य आहे, ऊर्जा आहे, आनंद आहे! असे स्वरूप निसर्गात, मानवी मनात, अवकाशात.... जेथे कोठेही आढळेल तेच देवाचे वसतीस्थान!
व्यक्तीगत नियती ही व्यापक स्वरूपातील नियतीचाच एक छोटा हिस्सा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक आशा, आकांक्षा, मनीषा, कृत्ये, हेतू आणि पूर्वकृत्यांप्रमाणे व्यक्तीगत नियतीत फरक पडत जातो. परंतु तरीही व्यक्तिगत नियतीपेक्षा जी सर्वसमाविष्ट करणारी, व्यापक स्वरूपातील नियती आहे ती कायमच प्रभावी ठरते. अनेक व्यक्ती एकत्र येऊन आपल्या व्यापक नियतीला कलाटणी देऊ शकतात हेही खरे आहे! सं गच्छध्वं ।