हे प्रकार पूर्वीच्या काळात अधिक होते. त्याचे कारण बहुधा समस्त महिलावर्ग श्रावणात व्रतवैकल्ये, उपासतापास, सोवळेओवळे, जागरणे व ते खेळ अशा धार्मिक गोष्टींत मग्न असे. मग पुरुषांनी गुळगुळीत दाढी केली तरी त्याकडे बघणार कोण? त्यातून पुन्हा काही बोलायला जवळ जावे तरी त्या हेतूविषयी शंका आणि डाफरणे वाट्याला यायचे. 'मी सोवळ्यात आहे. उगा खेटायला येऊ नका. काय सांगायचे ते लांबून सांगा' या शब्दांत संभावना. त्यामुळे 'फुले वेचिली पण ही आता द्यावी कोणालागी' या कवितेच्या ओळीसारखी 'दाढी केली तरी त्याचे कौतुक सांगावे कोणाला? ' अशी भावना पुरुषवर्गाच्या मनात येत असावी. त्यातूनच 'जाऊ दे मरू दे ती दाढी' अशा विफलतेतून पुढे हा आळस अंगवळणी पडला असावा.