सनी पाटकर यांनी लिहिलेला हा विनोद वाचून आपल्या अंगात पूर्वीच्या काळातील अश्लीलमार्तंड कृष्णराव मराठे संचारण्याचे काहीच कारण नाही. हा विनोद थोडा आंबट किंवा स्पष्टच म्हणायचे झाले तर चोरट्या संबंधांचा सूचक असला तरी विनोदाचा हाही फॉर्म रुढ आहे आणि श्रेष्ठ मराठी लेखकांनीही तो हाताळला आहे. आचार्य अत्र्यांचा 'विनोदाचे तत्त्वज्ञान' हा लेख अतिशय सुंदर आणि वाचनीय आहे. त्यात विनोदाचे विविध प्रकार वर्णन केले आहेत. त्यात 'अपेक्षाभंगातून निर्माण होणारा विनोद' या गटात वरील विनोद मोडतो. अत्र्यांनी नमूद केले आहे, की विनोद कधी एकटा येत नाही. येताना चावटपणा, वात्रटपणा, उपरोध, टीका यासारखी आपली भावंडेही घेऊन येतो. शारीरिक व्यंग, विक्षिप्तपणा, देहधर्म, स्त्री-पुरुष प्रणय व चोरटे संबंध, लैंगिक अवयव आणि कृती या गोष्टी एरवी उघडपणे लिहिणे बोलणे समाजात अशिष्ट मानले जाते, पण त्याच गोष्टी विनोदाच्या माध्यमातून मांडल्या तर त्याबाबत समाजाची हरकत नसते.

कॉमेडियन जॉनी लिव्हर त्याच्या कार्यक्रमात एक विनोद सांगत असे. 'एक मुलगा आपल्या आईला म्हणाला, की काल मी आपला पांडू गडी आणि शांताबाई कामवालीला कोठीच्या खोलीत एकत्र बघितले. पांडू तिला चिमटे काढत होता. हे ऐकल्यावर आई रागाने पांडूला खडसावते. बिचारा पांडू पुन्हापुन्हा आपण तसे काही केले नसल्याचे सांगत असतो. शेवटी गोंधळलेल्या आईला तो मुलगा म्हणतो, 'मम्मी एप्रिल फूल! तो पांडू नव्हताच. अगं ते आपले पप्पा होते. ' आता एकाच जातकुळीतील या विनोदाने लाखो लोक हसले असतील, पण कधी कुणी त्याचा मुद्दा बनवलेला नाही. आजकाल आपण मनमुराद हसणे विसरलोय का?

मला वाटते, की आपल्या पूर्वीच्या पिढीतले लोक विनोदाकडे अधिक निकोप नजरेतून पाहाणारे आणि खेळकर होते. याचे एक उदाहरण देतो. गेल्या पिढीतील एक श्रेष्ठ विनोदी लेखक वि. वि. बोकील होते. त्यांच्या एका कथेचे कथानक पाहा. 'नवीन लग्न झालेले दोन मित्र शेजारी राहात असतात. त्यांची मैत्री खूप घट्ट असते. प्रसंगावशात दोघांचीही वेगवेगळ्या गावी बदली होते व पुढे वेगवेगळ्या गावी प्रवास होत राहतो. २५ वर्षांनी पुन्हा ते एका गावी येतात. दोन्ही मित्रांना आणि त्यांच्या बायकांनाही खूप आनंद होतो. दोघाही मित्रांना एक मुलगा-एक मुलगी अशी अपत्ये असतात. मुलांच्या ओळखी झाल्यावर पहिल्या मित्राचा मुलगा दुसऱ्या मित्राच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तो घरी परवानगी मागतो तेव्हा वडील विवाहाला विरोध करतात. जेव्हा पत्नी पतीला विरोधाचे कारण विचारते तेव्हा तो अपराधीपणे कबूली देतो, की २५ वर्षापूर्वी त्याचा मित्राच्या पत्नीशी सहवास आलेला असतो आणि ती मुलगी त्याची असते. एका अर्थी हा भाऊ-बहिणीचा विवाह ठरणार असतो म्हणून त्याच्या मनाला ते पटत नसते. हे ऐकल्यावर पत्नी दुसरीकडे पाहात गालातल्या गालात हसत नवऱ्याला म्हणते, 'काहीतरीच विचार करता तुम्ही. हा मुळीच भाऊ-बहिणीचा विवाह ठरणार नाही. मी सांगते. ' या वाक्याने गोष्ट संपते.

आणि ही कथा माझ्या माहितीनुसार 'सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथा' नावाने जे १५ खंड प्रसिद्ध झाले (प्रकाशन आठवत नाही) त्यात मान्यवर लेखक-संपादकांनी निवड करून समाविष्ट केलेली आहे.