एखादा भाग वाचकांना आवडला नाहीं म्हणून नाउमेद होऊं नये.
- अरे! अजिबात नाउमेद नाही मी कांदळकरसाहेब. या आठवड्याचे पहिले तीन दिवस जरा घाईगर्दीतच गेले. परवा फक्त कविता विभागात चक्कर मारली आणि वैभव देशमुख यांच्या ताज्या-टवटवीत कवितांना प्रतिसाद दिला. त्या वेळी साहित्य विभागात येण्याइतका वेळही नव्हता. आज जरा वेळ मिळाला तर तुमचा प्रतिसाद दिसला. तुम्ही पुढच्याचा किती बारीक विचार करता! अतिशय दुर्मिळ गुण आहे हा...

इथें प्रतिसादांची संख्या हा मीं लेखनाच्या लोकप्रियतेचा एक निकष मानला आहे.
- अं... असे मानत जाऊ नका प्लीज. प्रतिसाद मिळतात किंवा मिळत नाहीत. मी एवढ्याच दृष्टिकोनांमधून त्यांच्याकडे पाहतो. खूप प्रतिसाद मिळाले म्हणून हुरळून जात नाही की शून्य प्रतिसाद मिळाले म्हणून खवळून जात नाही. :) खचून तर अजिबात जात नाही. :). मुळात हे सदर प्रतिसादांसाठी नाहीच, याची तुम्हाला जाणीव असणार, याची मला खात्री आहे.
आणि मी संधी मिळेल तेव्हा, या सदरामागील माझा उद्देश अगदी स्पष्ट केलेला आहे. तो म्हणजे स्मरणाआडच्या जास्तीत जास्त कवींच्या कार्याचा दस्तऐवज / दस्तावेज (डॉक्युमेंटेशन) तयार व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांपुढे हे जुने कवी जावेत. माझ्या क्रमवारीची यादीच करायची झाल्यास.... १) हे सदर लिहिताना मला मनःपूत आनंद मिळतो. २) स्मरणाआडच्या कवींचे डॉक्युमेंटेशन होत आहे. ३) जास्तीज जास्त लोकांना या कवींची ओळख होत आहे... असे क्रम मी लावीन. या यादीत तीनच क्रमांक आहेत! 'प्रतिसाद' चौथ्या क्रमांकावरही नाहीत. :)


जो चुकीचा देखील असूं शकतो.
- तुमचा निकष चुकीचा नसूही शकेल.

शंभरेक वर्षांपूर्वींची कविता आजच्या रसिकांना आवडण्याची तशी शक्यता कमीच. कधीं कधीं कविताविषय न आवडल्यामुळेंही कविता रसिकांना आवडत नाहीं.
- हो. हे खरे आहे. मात्र, जी गोष्ट करायची, ती करताना आधी आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. आधी ती आपल्याला आवडली पाहिजे... इतरांना तीतून आनंद मिळेलच असे नाही. इतरांनी ती आवडेलच असे नाही. इतरांना आनंद मिळाला, इतरांना ती आवडली तर 'बोनस'च!
महाकवी गालिबची एक मिष्किल ओळ इथे आठवते : मुफ्त हाथ आए तो बुरा क्या है? (प्रतिसादांकडे पाहताना मी ही ओळ मी नेहमी ध्यानात ठेवतो! )   :)

मला व्यक्तिशः कोवळी स्मिताची कळी ही एकच कविता आवडली.
- :) धन्यवाद. रहाळकरांच्या कवितांचे पुस्तक खूपच दुर्मिळ आहे. मी खूप शोध घेतला. पुस्तक हाती असले की निवडीला वाव राहतो. पण या वेळी इलाजच नव्हता. ज्या ओळी उपलब्ध झाल्या, तेवढ्याच दिल्या.

तरी आपण म्हटल्याप्रमाणें कवितेंत नाद जाणवतो आहे. बहुतेक कवितांतील वापरलेल्या व्यंजनांचें उच्चारसौंदर्य छान आहे.
- हो. अगदी खरे आहे तुमचे म्हणणे. जुन्या कवींचे कवितांचे विषय काय होते, त्यांची शैली कशी होती, हे यातून कळते.

केशवसुतांनी स्वतःलाच 'नापसंत' वाटणाऱया सुरुवातीच्या काळातील कवितांचा होम केला
हें प्रथमच कळलें केशवसुतांच्या अभिरुचीला सलाम.
- अगदी. अगदी. उगाच नव्हते ते नवकवितेचे प्रवर्तक! :)

पुढील भाग नव्या जोमानें, नव्या उभारीनें येऊं द्यात.
- नक्कीच. नक्कीच. नव्या जोमाने, नव्या उभारीने पुढील भाग लिहीन. अजून खूप कवी राहिले आहेत. मला माहीत असलेले जवळपास २५-३०! या सगळ्यांविषयी मी लिहिणार आहे. मला माहीत नसलेलेही खूप असतील... शोध घेत राहू आपण!

आपण घेत असलेली मेहनत स्पष्ट दिसते आहेच.
- मेहनत अशी काही नाही म्हणा. अनेक पुस्तके, कात्रणे चाळावी लागतात. उताणीपाताणी करावी लागतात, एवढेच. तशी कितीही मेहनत घेता येईल. मुख्य म्हणजे हे करताना खूप आनंद मिळतो, समाधान मिळते. जुन्या काळात वावरल्यासारखे वाटते. (मला आवडते जुन्या काळात वावरायला! )

शुभेच्छा.
-पुन्हा एकदा धन्यवाद.

शेवटी, अहमद फराज यांचा एक शेर मला इथे आठवतो. तो दिल्यावाचून राहवत नाही.

हमसफर चाहिए, हजूम नही
इक मुसाफिर भी काफला है मुझे ।


- प्रदीप कुलकर्णी